गणेश मूर्त्या बनविण्यास प्रारंभ

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

श्री गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर रोजी येत असल्याने प्रतिवर्षाच्या गणेशोत्सव सणाला अद्याप तीन महिन्यांचा कालावधी असून मुरुड तालुक्यातील बहुतांशी गावातील गणेश मूर्तीकारांसह नांदगावमधील काही मूर्ती कारागिरांनी मूर्त्या बनविण्याच्या कामास सुरुवात केली आहे.

विनायक चतुर्थीचा म्हणजेच 10 जूनचा मुहूर्त साधून नांदगावमधील मूर्तीकार सतीश जोशी यांनी शाडूच्या मातीचे पूजन करून मूर्त्या बनविण्यास प्रारंभ केला आहे. सद्या येथे मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी काही दिवसातच त्याने ओढ दिल्याने येथे कडक ऊन पडत आहे त्याचा फायदा उठवित तयार मूर्त्या वाळविण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. नंतरच्या काळातील कामाची घीसडघाई टाळण्यासाठी लवकरच सुरूवात केल्यास पुढे त्याचा फायदा होत असल्याचे मूर्तीकार जोशी यांनी सांगितले.

तसेच, यावर्षीदेखील शाडूच्या मातीच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय रंग साहीत्याच्या दरातही वाढ झाली आहे. येथील बहुतांशी मूर्तीकार प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या तयार मूर्त्या पेण तालुक्यातून आणतात. केवळ रंगकाम करुन त्यांची विक्री करतात. यावर्षी त्यांच्या कच्च्या मूर्त्यांच्या किमतीतही शंभर रुपयांपासून वाढ झाली असल्याने गणेश मूर्त्यांच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे स्थानिक कलाकार बोलत आहेत.

Exit mobile version