कंत्राटी कामगारांची उपासमार

ठेकेदाराने थकवले चार महिन्याचे वेतन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील राजपुरी हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यात साफसफाईकरिता नऊ कंत्राटी कामगार व त्याच परिसरात असणारी खोकरी येथील एका कंत्राटी कामगारांची नेमणूक ठेकेदारांकडून करण्यात आली होती. यामध्ये सात पुरूष असून, तीन महिला कामगारांचा समावेश आहे. या कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन रखडल्याने कामगारांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. थकीत वेतन त्वरित द्यावे, अशी मागणी जंजिरा किल्ल्यात काम करणार्‍या कंत्राटी कामगारांनी केले आहे.

ऐतिहासिक जंजिरा किल्ला साफसफाईकरिता पुरातत्व विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने कंत्राटी पद्धतीने कामगार घेतले जातात. हे काम चलप इंजिनियरिंग सोल्युशन्स औरंगाबाद या कंपनीला दिले असून, त्या ठेकेदाराकडून मनुष्यबळ पुरविले जाते. कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात ठेकेदारांकडून वेतन देणे आवश्यक असते. परंतु, हाताच्या पोटावर जगणार्‍या कर्मचार्‍यांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या चार महिन्यांपासून ठेकेदारांकडून वेतन दिले गेले नाही. त्यामुळे जगावे कसे, असा प्रश्‍न कामगारांना पडला आहे. संबंधित चलप इंजिनियरिंग सोल्युशन्स-हर्सूल औरंगाबाद या ठेकेदाराकडे वारंवार पगार मागूनदेखील अद्याप पगार जमा करत नाही. त्यामुळे कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चलप इंजिनिअरिंग सोल्युशन्स औरंगाबाद या कंपनीच्या ठेकेदार सय्यद मोबीन यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की, जंजिरा किल्ल्यात व खोकरीत काम करणार्‍या कामगारांचे बिल सहाय्यक संवर्धन अधिकारी पुरातत्व विभाग, मुरुड अलिबाग यांच्याकडे पाठविले आहेत. तिथून मला बिल न मिळाल्याने मला माझ्या कंत्राटी कामगारांना वेतन देता येत नाही. आचारसंहितेमुळे फंड जमा होत नसल्याने बिले थकली असावीत, अशी शक्यता वर्तवण्यात आली. बिल पास झाल्या-झाल्या कंत्राटी कामगारांची बिले काढण्यात येतील.

सहाय्यक संवर्धन अधिकारी पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांना विचारणा केली असता ठेकेदार सय्यद मोबीन यांनी माझ्याकडे बिले पाठवली आहेत. तीच बिले ताबडतोब मुंबई पुरातत्व कार्यालयाकडे पाठवली आहेत. तिथून बिले पास होणे जरुरीचे आहे. शासन दरबारी बिले ताबडतोब होत असतात, तर कधी उशीर होत असतो. त्या बिलावर ठेकेदारांनी अवलंबून राहणे चुकीचे आहे.

जर कामगारांनी संप केला, तर किल्ल्यात अस्वच्छता पसरेल आणि याचा परिणाम पर्यटकांवर होईल. तरी ठेकेदारांनी या पगारावर अवलंबून न राहता आपल्या कामगारांना थोडं तरी वेतन देऊन शांत करावे. बिले पास झाली की उर्वरित वेतन पूर्ण करुन कामगारांना दिलासा द्यावा.

बजरंग येलीकर,
सहाय्यक संवर्धन पुरातत्व विभाग
Exit mobile version