कर्जात डूबलेल्या ठेकेदारांवर उपासमारीची वेळ

महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटनेकडून काम बंदची हाक

| वेनगाव | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटनेच्या ठेकेदारांनी राज्यासहित जिल्ह्यात व तालुक्यात केलेल्या कामांचे सुमारे 12 हजार 500 कोटी रुपये थकीत राहीले आहेत. त्यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाचे डोळे उघडण्यासाठी महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटनेने याविरुद्ध काम बंद आंदोलन करण्याचे ठरविले असून त्याला कर्जत तालुका ठेकेदार संघटनेने पाठींबा दिला आहे.

गणपतीच्या सणाच्या वेळी निधी उपलब्ध झाला नाही, तर आता दिवाळीत तरी निधी उपलब्ध होईल या आशेवर ठेकेदार होत. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली व दिवाळी देखील अंधारात गेली आहे. येत्या चार पाच दिवसात निधी उपलब्ध झाला नाही तर 1 डिसेंबर 2023 पासून सुरू असलेली सर्व कामे आहे. त्या स्थितीत ठेवून काम बंद करण्यात येतील व याला सर्वस्वी शासन-प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर व सचिव उदय पाटील यांनी दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठेकेदारांकडून होत असलेली तालुक्यातील कामे हि साखळी पद्धतीने एकमेकांवर अवलंबून राहून होत असतात. कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे सभासद असलेल्या छोट्या-मोठ्या ठेकेदारांनी गेल्या वर्षभरात स्वतःच्या पैशातून पुल, शासकीय इमारती, रस्ते, व अन्य कामे पुर्ण केली आहेत. पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांचे जवळपास 55 कोटी रुपये अडकून पडले आहेत. शासनाकडून प्रथमच गणपती आणि दिवाळीच्या सणांच्या वेळी यावर्षी कर्जतच्या कामांसाठीही अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे कर्जाने घेतलेल्या मुद्दलीवर व्याज वाढत असून ठेकेदार चिंताग्रसस्त झाला आहे. उधारीवर घेतलेल्या साहित्याची देणी कशी द्यावी, असा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. एकीकडे देणीदार पैशाचा तगादा लावत असून कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, अशी चिंता त्यांना सतावत आहे. आत्ता उपासमारीची वेळ आली असल्याचे डाळिंबकर यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version