चोर सोडून जाळी फाडल्याने संताप
| उरण | वार्ताहर |
जेएनपीएच्या विस्तारीकरणाचे म्हणजे चौथ्या बंदराचे काम प्रगतीपथावर सूरू आहे. हे काम सुरू असलेल्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांची जाळी फाडून टाकली जात असून, जाळ्यातील मासळीदेखील चोरून नेली जात असल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. त्यामुळे उपासमारीचे संकट ओढवले असून, मच्छिमारांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जेएनपीएच्या चौथ्या बंदराचे काम सध्या वेगाने सुरू आहे. जेएनपीए, पाणजे, मोरा दरम्यानच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात भरावाचे काम आणि इतर कामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी या चौथ्या बंदराचे काम होणार आहे त्या ठिकाणी मच्छिमारांना मच्छिमारीसाठी बंदी करण्यात आली आहे. परिणामी, येथील स्थानिक पारंपरिक मच्छिमारी करणारे बंदी घातलेल्या जागेपासून 100 ते 200 मीटर अंतरावर आपली जाळी लावून मच्छिमारी करत असतात. मात्र, कंपनीचे सामान चोरले जात असल्याच्या संशयावरून चौथ्या बंदराचे काम करणारे ठेकेदार हे मच्छिमारांची जाळी कापून फाडून टाकत आहेत. शिवाय, या जाळ्यांमध्ये असलेली मासळी चोरून घेऊन जात आहेत, असा आरोप मच्छिमारांनी केला आहे. कंपनीच्या या दादागिरीमुळे मोरा, हनुमान कोळीवाडा, पाणजे या गावातील पांरपरिक मच्छिमारी करणाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढवले असून जेएनपीएच्या या दादागिरीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आमचे मच्छिमार बांधव हे जेएनपीएने बंदी घातलेल्या ठिकाणापासून 200 मीटर दूर जाळी टाकतात, तरीदेखील कंपनीचे अधिकारी दादागिरी करतात. जेएनपीएने यामध्ये लक्ष घालून पारंपरिक मच्छिमारांना न्याय द्यावा, अन्यथा मच्छिमारांतर्फे आंदोलन करण्यात येईल.
जेयवीन कोळी, मच्छिमार नेते




