अरे बापरे! स्टेट बँकेत घोटाळा; व्यवस्थापकासह 16 जणांवर गुन्हे दाखल

State Bank of India

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील स्टेट बँकच्या शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या शैषव नरेंद्र नलावडे यांच्यासह 16 जणांवर बनावट कागदपत्रे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज प्रकरणे बनविताना आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. हा घोटाळा उघडकीस आला असून बँक व्यवस्थापकासह अन्य 16 जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत मुंबईत राहणारे शैषव नरेंद्र नलावडे हे शाखा व्यवस्थपक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात (1 जून 2021 ते 31 ऑक्टोबर 2021) नलावडे यांनी 16 बँक ग्राहकांची वैयत्तिक कर्ज प्रकरणे मंजूर करून अर्थ सहाय्य वाटप केले होते. मात्र ती सर्व 16 वैयत्तिक कर्ज प्रकरणे मंजुर करताना कायदेशीर बाबींचा अवलंब न करता स्वतःच्या हितासाठी अपुरी आणि बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता. त्या 16 बँक ग्राहकांना बँक व्यवस्थापकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे 1 कोटी 49 लाख 26 हजार 496 रुपयांचे कर्ज वाटप केले होते.

बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी त्यातील 1 कोटी रुपये रक्कम बँकेत भरली. मात्र उर्वरित 49 लाख 26 हजार 496 रक्कम त्यांनी न भरल्याने त्यांचे खाते एनपीए झाले. त्यामुळे बँकेकडून चौकशी झाली असता हा प्रकार उघड झाला. बँकेचे शाखा व्यवस्थापक नलावडे व एकूण 16 ग्राहकांनी बनावट कागदपत्रे देवून 49 लाख 26 हजार 496 रक्कम इतकी रक्कम न भरता अपहार करून फसवणूक केली. तसेच त्यातील काही रक्कम स्वत:च्या फायद्याकरीता वापरून रकमेचा अपहार केला होता. त्यामुळे या प्रकाराची बँकेने गांभीर्याने दखल घेत कर्जत पोलीस ठाण्यात नलावडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन प्रभारी अधिकारी सुहास गरड यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू रसेड हे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version