राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि.23 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळाला दिला.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. त्यांनी अजित पवार जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा काय म्हणाले हे देखील सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला एक जो चांगला मुख्यमंत्री मिळाला असता तो अजित दादांच्या रुपाने. ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि मला विश्वास आहे की शेवटी नियतीने त्यांचे स्वप्न पूर्ण केले असते. त्यांच्यामध्ये ती क्षमता नक्की होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणितं असतात. पण क्षमतेचा जर विचार केला मुख्यमंत्री पदाकरीता पूर्णपणे क्षमता असलेले नेतृत्त्व अजित दादांचे होते, असे ते म्हणाले.

यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनीदेखील भाषणात अजितदादांविषयीच्या आठवणी ताज्या केल्या. सभागृहात बोलताना, अजित पवार हे सभागृहात पहिला येणारा आणि शेवटी जाणारा नेता असायचे. चुकले तर कान पकडायचे व चांगले बोललो की स्तुती करायचे. व्यक्तिगत, बेकायदेशीर विषय घेऊन आलेल्यांचा त्यांना राग यायचा, अशी आठवण रोहित पवार यांनी काढली. दादांवर नको नको ते आरोप झाले. दादा तेव्हा अस्वस्थ व्हायचे. पण एकही आरोप सिद्ध करता आला नाही. दादा आता नाहीत, त्यामुळे ते आरोप व ते डाग आता पुसले पाहिजेत. आरोपांचे गाठोडे समुद्रात टाकले गेले तर ती त्यांना आदरांजली ठरेल, अशी मागणीही त्यांनी केली. अजितदादा मला झिपऱ्या कमी कर म्हणायचे. राजकीय वजन वाढवत जा. शारीरिक वजन कमी कर अे बोलायचे, अशी आठवण सांगताना रोहित पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर बोलताना आता मी जो लढा लढतोय, या लढ्याबद्दल दादाही मला शाबासकी देतील, असे म्हणत दादांच्या मृत्यूबद्दल आरोपींना तुरूंगात टाकल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. तसेच, यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांच्या मदतीला मी कायम उभा असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, विधिमंडळाचे या वर्षीचे हे पहिले अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाची सुरुवात आपण सर्वजण एका दुःखी अवस्थेमध्ये करत आहोत. आजपर्यंत नेहमी सभागृहात दिसणारे, आपले वाटणारे अजित दादा आज या सभागृहात किंवा या विधिमंडळात दिसत नाहीत. ही खंत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. माणसं येतात, माणसं जातात. माणसं असताना त्यांचे महत्त्व कधी कळत नाही आणि ती नसतात तेव्हा त्यांचे महत्त्व कळून काही उपयोग होत नाही. अनेक जण असे असतात की जी जवळ असताना कळत नाहीत; पण काही जण असे असतात की जी जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात. या विधिमंडळामध्ये अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अजित दादांसोबत झाली असेल. काळ एकच आहे, साहजिकच आहे. विशेषतः माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही अजित दादांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचारधारेच्या विरोधातली होती. आम्ही कधी एकत्र येऊ, असे ध्यानीमनी सुद्धा वाटले नव्हते. अजित दादांबद्दल म्हणायचे झाले तर दोन सकाळी अशा होत्या, त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला चटका देणारी होती, अंतःकरणाला चटका देणारी होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version