जंतर-मंतरवरील आंदोलन मागे
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या संतापाची धग अखेर सत्तेच्या दिल्लीदरबारापर्यंत पोहोचली. जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनासह देशभरातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावापुढे ‘नमो’ सरकारला अखेर नमते घ्यावे लागले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा शनिवारी (दि. 25) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केला. विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे सरकारला घेतलेली ही माघार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय मानला जात आहे. विद्यार्थ्यांनी सरकारसमोर ठेवलेल्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलन अधिकृतरित्या मागे घेतले आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या तिसऱ्या फेरीतील चर्चेनंतर विद्यार्थी प्रतिनिधी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषदेत आंदोलन समाप्त करण्याची घोषणा केली.
प्रधान यांनी राजीनामा देताना देशातील युवक हीच भारताची खरी ताकद असल्याचे सांगितले. तरुणांची दिशाभूल होऊ नये, ते अफवा किंवा भ्रमाच्या जाळ्यात अडकू नयेत, तसेच देशाची एकता अबाधित राहावी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर प्रक्रियेत अडकू नये, या भूमिकेतून आपण राजीनामा दिल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आंदोलनाऐवजी शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नीट परीक्षा प्रकरणावरून विद्यार्थ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून जंतर-मंतरवर आक्रमक आंदोलन सुरू होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अथवा सरकारने त्यांना पदावरून हटवावे, या मागणीवर विद्यार्थी ठाम होते. राजीनामा मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला होता.
केंद्र सरकार आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात शुक्रवारी चर्चेची फेरी झाली होती. सरकारच्या वतीने जे.पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. मात्र, प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर तोडगा निघाला नव्हता. शनिवारी पुन्हा चर्चा होणार असतानाच प्रधान यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
याशिवाय आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने सहमती दर्शवल्याचा दावा सीजेपीने केला आहे. भाजप किंवा त्यांच्या सहयोगी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जातील, तसेच भविष्यात आंदोलनकर्त्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या मागणीवरही सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे विद्यार्थ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या प्रस्तावांचा अभ्यास करून पुढील काळातही त्यांच्याशी संवाद सुरू ठेवण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनीही आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या चारसूत्री प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. सरकारकडून प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना शांततेने घरी परतण्याचे आवाहन केले.
गेल्या काही दिवसांपासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईमुळे वातावरण अधिक तापले होते. मात्र, चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतर सरकारने मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने अखेर आंदोलनाची सांगता झाली आहे. विद्यार्थ्यांच्या एकजुटीने आणि सातत्यपूर्ण लढ्याने सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात आला आहे.
मोदी, शाहना सुनावलं
आपण शांत राहणं हीच आपली ताकद आहे. आपण असंच शांतीने इथे बसून राहू. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे पोलिसांमार्फत काम चालवायचे. मात्र, आता यांनी आरएसएसचे गुंडही पाठवले. त्यामुळे पोलीस आणि आरएसएसच्या गुंडांनी यावं. मात्र, हे आंदोलन संपणार नाही, असं म्हणत दीपके यांनी मोदी-शहांवर हल्लाबोल करत आरएसएस आणि पोलिसांनाही सुनावलं.
लोकशाहीने कात टाकली : शरद पवार
नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनात विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या जिद्दीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केले. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे आणि त्याचे श्रेय देशातील युवा पिढीला जाते, असे पवार यांनी म्हटले.
सुबह हो गई मामू..!
सुबह हो गई मामू… लोकशाहीची सकाळ झाली आहे. देशाची जनता जागी झाली आहे. मी आधीच सांगितलं होतं, ही पहिली विकेट आहे. इथेच थांबणार नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. मला हिरो बनवू नका. ही चूक पुन्हा करू नका. एका व्यक्तीला हिरो बनवल्यामुळे आणि त्याला संविधानापेक्षाही मोठं मानल्यामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. मी मोडेन, पण वाकणार नाही. चुकीच्या माणसाशी पंगा घ्यायचा नाही. या सरकारमध्ये कोणीही राजीनामा देत नाही, असं सरकारच म्हणत होतं. पण आम्ही राजीनामा घेऊन दाखवला, असा दावा अभिजित दिपके यांनी केला.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांनी अखेर उशिरा का होईना राजीनामा दिला. हा लाखो विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा आणि बलिदानाचा विजय आहे. परीक्षेतील गैरव्यवस्थेमुळे ज्यांनी आपली स्वप्ने गमावली, ज्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा विजय समर्पित आहे. या चळवळीत सत्तेच्या अहंकाराने विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला, अश्रुधुराचा मारा झाला, आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला. पण, या दडपशाहीला सत्याचा पराभव करता आला नाही. हा देश कोणत्याही हुकूमशहाचा नाही. हा देश छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्याय आणि संविधानाच्या विचारांनी उभा आहे. या लढ्यात रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे, युवकाचे, सामाजिक कार्यकर्त्याचे आणि लोकशाहीच्या बाजूने ठाम उभ्या राहिलेल्या प्रत्येक विरोधी पक्षाचे योगदान इतिहास विसरणार नाही. हा राजीनामा शेवट नाही; तो व्यवस्थेला दिलेला स्पष्ट इशारा आहे. लोकशाही जिवंत आहे, कारण देशाचे युवा अजूनही लढत आहेत. आणि जेव्हा तरुण लढतात, तेव्हा सत्तेचे सिंहासनही हादरते. या लढ्यात बलिदान दिलेल्या तमाम विद्यार्थ्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हा विजय समर्पित करण्यात येत आहे. या घटनेनंतर लोकशाही किती धोक्यात आहे, हे पुढच्या पिढीने शिकण्याबरोबरच राजकारणाच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे.
– चित्रलेखा पाटील, शेकाप प्रवक्त्या
आज खूप दिवसांनी मनापासून आनंद झाला आहे. तरुणाई जिंकली आहे. त्यांच्या निर्धाराला, जिद्दीला, चिकाटीने केलेल्या लढ्याला सलाम. ज्या युवा साथींनी मार खाल्ला, रक्त सांडले, रस्त्यावर राहिले, अश्रूधूर अनुभवला, त्यांच्या वेदनादायी अनुभवांशी सहवेदना राखत हे सांगायला हवे, की ते वाया गेले नाही. आमच्या पिढीला अभिमान वाटतो आणि खूप आनंद होतो आहे की या देशातील लोकशाही जेन झीच्या हातात सुरक्षित राहील. या लढ्याद्वारे देशातील सर्वधर्मीय तरुणाईने एकत्र येऊन आयडिया ऑफ इंडिया परत उभी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला साक्षी ठेवून हे आंदोलन केले. त्यांच्या विचारांना खरी आदरांजली तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा देशातील लोकशाही विरोधी, संविधान विरोधी शक्तीला सत्तेतून पायउतार करण्यात येईल.
– उल्का महाजन
सर्वहारा जन आंदोलन
भारत जोडो अभियान







