यजमान सांगलीची विजयी सलामी
। सांगली । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने व युवक मराठा मंडळाच्या सहकार्याने सांगली जिल्हा कबड्डी असो. तर्फे सांगलीतील सांगलवाडी येथील चिंचबाग मैदानावर 51 व्या कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत यजमान सांगलीसह पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, मुंबई शहर पूर्व आणि पश्चिम, सोलापूर, अहमदनगर, उपनगर पूर्व व रायगड या संघानी विजयी सलामी दिली आहे.
या स्पर्धेत ‘फ’ गटातील सामन्यात यजमान सांगलीने बीडचा 82-11 असा धुव्वा उडवीत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली आहे. पूर्वार्धात 2 लोण देत 35-06 अशी आघाडी घेणार्या सांगलीने उत्तरार्धात धुव्वादार खेळ करीत आणखी 4 लोण देत गुणांचे पाऊण शतक पार केले. याच गटात मुंबई शहर पूर्वने उस्मानाबादचा 63-25 असा पराभव केला. पूर्वार्धात 2 लोण देत 32-17 अशी आघाडी घेणार्या मुंबईने उत्तरार्धात आणखी 3 लोण देत हा मोठा विजय साकारला.
‘अ’ गटात गतविजेत्या पिंपरी-चिंचवडने पालघरला 40-30असे नमविले. विश्रांतीला 20-12 अशी आघाडी घेणार्या पिंपरी-चिंचवडने नंतरही त्याच जोमाने खेळत विजय साकारला. ‘ब’ गटात पुणे ग्रामीणने पुणे शहरचा कडवा प्रतिकार 35-32 असा मोडून काढत पहिला विजय नोंदविला. पहिल्या डावात 12-17 अशा पिछाडीवर पडलेल्या पुणे ग्रामीणने ही किमया केली. ‘क’ गटात मुंबई उपनगर पूर्वने जळगावला 54-30 असे रोखले. उपनगरने आक्रमक सुरुवात करीत मध्यांतरापर्यंत 2 लोण देत 35-13 अशी मोठी आघाडी घेतली. नंतर सावध खेळ करीत आघाडी टीकविण्यावर भर देत विजय साकारला.
‘इ’ गटात मुंबई शहर पश्चिमने रत्नागिरीचे कडवे आव्हान 34-33 असे परतवून लावत पहिला साखळी विजय प्राप्त केला. पहिल्या डावात 11-17 अशा पिछाडीवर पडलेल्या मुंबईने सामन्याच्या शेवटच्या क्षणाला गुण घेत ही किमया केली. याच गटात परभणीने नांदेडला 80-20 असे धुवून काढले. पूर्ण डावात 7 लोणची नोंद करीत परभणीने गुणांचे पाऊण शतक पार केले. याच ‘इ’ गटात नंदुरबारने मुंबई उपनगर पश्चिमला 40-28 असे पराभूत करीत कबड्डी रसिकांना आश्चर्याचा धक्का दिला. पहिल्या डावात सावध खेळ करीत 17-14 अशी आघाडी घेणार्या नंदुरबार ने उत्तरार्धात जोषपूर्ण खेळ करीत 12 गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला.
इतर निकाल:- ‘ब’ गट 1. सोलापूर वि. औरंगाबाद 55-36, 2. पुणे शहर वि. औरंगाबाद 67-26, 3. पुणे ग्रामीण वि. सोलापूर 51-24, ‘क’ गट 1. जालना वि. ठाणे ग्रामिण 47-17, 2. मुंबई उपनगर पूर्व वि. ठाणे ग्रामीण 21-18, ‘ग’ गट 1. रायगड वि. लातूर 55-20, 2. अहमदनगर वि. सातारा 38-19, ‘ड’ गट 1. नाशिक ग्रामीण वि. कोल्हापूर 31-24, 2. धुळे वि. हिंगोली 49-25, ‘ह’ गट ठाणे शहर वि. सिंधुदुर्ग 50-14,