राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

पिंपरी चिंचवड, ठाणे ग्रामीण, जालना, कोल्हापूर उपांत्यपूर्व फेरीत

। मनमाड । वृत्तसंस्था ।

ठाणे ग्रामीण, जालना, कोल्हापूर यांनी 35व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या किशोर गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असो.च्या विद्यमाने मनमाड नाशिक येथील स्व. माणकचंद ललवाणी इस्टेट मैदानातील मॅट वर सुरू असलेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पिंपरी चिंचवडने पालघरचे आव्हान 49-34असे संपुष्टात आणले.

मनीष काळजे, विजय राठोड यांच्या चढाया त्यांना सुशांत वाघमारे याची मिळालेली पिढीची साथ यामुळे हा विजय शक्य झाला. पालघरने दुसर्‍या डावात लोण देत सामन्यात रंगत निर्माण केली. पण विजय मात्र त्यांच्यापासून दूरच राहिला. मंथन पाटील, ध्रुव डोंगरे पालघर कडून उत्कृष्ट खेळले. ठाणे ग्रामीणने उस्मानाबादला 60-45 असे नमवित आगेकूच केली. मध्यांतराला 33-24 अशी आघाडी ठाण्याकडे होती. या सामन्यात बोनस गुणाची लयलूट झाली. ठाण्याने एकूण 17, तर उस्मानाबादने 8 बोनस गुणाची नोंद केली. निखिल गायकर, विवेक चोरगे यांच्या झंझावाती खेळाला ठाणे ग्रामीणच्या विजयाचे श्रेय जाते. उस्मानाबादचा विश्‍वनाथ सुपेकर एकाकी लढला. जालनाने जळगांवला 59जी20 असे नमवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. हा सामना तसा एकतर्फी झाला. विश्रांतीला 32-08 अशी भक्कम आघाडी घेणार्‍या जालनाने नंतर देखील जोषपूर्ण खेळ करीत 39 गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. तुकाराम दिवटे, रितेश आढे यांच्या तुफानी चढायांना जळगावकरांकडे उत्तर नव्हते. प्रतीक आढे यांनी उस्मानाबादकडून भक्कम बचाव केला. जळगावकडून रणजीत भिलाल, अजय काशिकर बरे खेळले. कोल्हापूरने औरंगाबादला 41-28 असे नमवित आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली. पूर्वार्धात 21-13 अशी आघाडी घेणार्‍या कोल्हापूरने उत्तरार्धात संयमाने खेळत सामना 13गुणांच्या फरकाने जिंकला. हर्षवर्धन पाटील, प्रशांत अकिगे, समर्थ ढोंबरे यांच्या चढाई पकडीच्या खेळाला कोल्हापूरच्या विजयाचे श्रेय जाते.

Exit mobile version