पार्ले स्पोर्टस्, शिवशंकर, कर्नाळाची आगेकूच
। ठाणे । वृत्तसंस्था ।
श्री मावळी मंडळ आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धेतील पुरुष विभागात मुंबई उपनगरच्या पार्ले स्पोर्टस् क्लब व जय भवानी तरूण मंडळासह ठाण्याच्या शिव शंकर क्रीडा मंडळानेही पुढल्या फेरीत प्रवेश केला. महिला विभागात रायगडच्या कर्नाळा क्रीडा व पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्टस् फाऊंडेशन संघांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करीत पुढे पाऊल टाकले.
महिला विभागात कर्नाळा क्रीडा संघाने मुंबई शहरच्या अमर हिंद मंडळाचा 36-20 असा 16 गुणांनी पराभव केला. मध्यांतराला कर्नाळा क्रीडा संघाकडे 15-13 अशी 2 गुणांची नाममात्र आघाडी होती. त्यानंतर कर्नाळा क्रीडा संघाच्या तेजा सकपाळ, रश्मी पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली व सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. पराभूत संघाकडून श्रद्धा कदम हिने एकाकी लढत दिली.
अन्य सामन्यात पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्टस् फाउंडेशन संघाने चिपळूणच्या स्वराज्य स्पोर्टस् अकादमीचा संघाचा 51-13 असा 38 गुणांनी धुव्वा उडवून घोडदौड केली. प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्टस् फाउंडेशन संघाच्या हर्षा शेट्टी व अंकिता पिसाळ यांनी खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवत मध्यांतराला 27-06 अशी 21 गुणांची विजयी आघाडी घेतली. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ करीत सामना 38 गुणांनी जिंकला. पुरुष विभागातील सामन्यात मुंबई उपनगरच्या पार्ले स्पोर्टस् क्लब संघाने रायगडच्या टी. आय. पी. एल. क्लब पनवेल संघावर 43-19 असा 24 गुणांनी मात करीत तिसर्या फेरीत प्रवेश केला. या सामन्यात मध्यंतराला पार्ले स्पोर्टस् क्लब संघाने 17-09 अशी आश्वासक आघाडी घेतली ती आकाश गायकवाड व अभिषेक गिरी यांच्या सुंदर खेळामुळे. ही आघाडी कायम ठेवीत पार्ले स्पोर्टस् क्लब विजयी ठरला.