पुरुष गटात सोलापूर, मुंबई, पुणे, सांगली विजयी
| बीड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि बीड जिल्हा ॲम्युचर खो-खो संघटनेच्या आयोजनाखाली बीड येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू झालेल्या 61 व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बलाढ्य संघांनी विजयी सलामी देत आपली ताकद दाखवून दिली. पुरुष गटात सोलापूर, मुंबई, पुणे, सांगली, मुंबई उपनगर, तर महिला गटात धाराशिव, पुणे, रत्नागिरी संघांनी यशस्वी सुरुवात केली.

सोलापूरने नांदेडचा 45-20 असा पराभव केला. सोलापूरकडून अजित रणदिवे (2.40 मि. संरक्षण व 4 गुण), प्रतीक शिंदे (2.20 मि. संरक्षण व 4 गुण), तर जुबेर शेख (1.10 मि. संरक्षण व तब्बल 10 गुण) यांनी जोरदार खेळ केला. मुंबईने हिंगोलीवर 56-8 असा एकतर्फी विजय मिळवला. मुंबईकडून हितेश आग्रे (नाबाद 2.20 मि. संरक्षण व 6 गुण), सम्यक जाधव (1.46 मि. संरक्षण व 2 गुण), व वेदांत देसाई (1.50 मि. संरक्षण व 4 गुण) यांची कामगिरी दमदार झाली.
पुण्याने छत्रपती संभाजीनगरचा 53-18 असा पराभव केला. पुण्याकडून प्रतीक वाईकर (3.20 मि. संरक्षण व 2 गुण), शुभम थोरात (2.20 मि. संरक्षण) व अथर्व दहाणे (2.50 मि. संरक्षण) यांची खेळी छान झाली. ठाणे विरूध्द पालघर सामना मध्यंतराला 15-15 असा बरोबरीत होता. मात्र त्यानंतर ठाण्याने लौकिकाला साजेसा खेळ करत पालघरचा 43-29 असा 14 गुणांनी पराभव केला. ठाण्याकडून हर्षित कोळी (2.39, 2.10 मि. संरक्षण व 2 गुण), शुभम डगळे (1.30 मि.
अहिल्यानगरने जालन्यावर 45-12 अशी 33 गुणांनी मात केली. अहिल्यानगर कडून नरेंद्र तातकडे (3.10 मि. संरक्षण), पृथ्वीराज (2.50 मि. संरक्षण), विशाल दुकळे (नाबाद 1.50 मी संरक्षण व 4 गुण) यांची खेळी उत्कृष्ट झाली.
पुरुष गट इतर निकाल :
सांगलीने बीडचा 40-20, मुंबई उपनगरने सिंधुदुर्गचा 46-22 व धाराशिवने लातूरचा 67-12 असा दणदणीत पराभव केला.
महिला गटात धाराशिवने परभणीचा 57-10 असा पराभव केला. धाराशिवकडून जान्हवी पेठे (3.20 मि. संरक्षण व 10 गुण), प्रणाली (3.10 मि. संरक्षण व 6 गुण), व संध्या सुरवसे (3.10 मि. संरक्षण व 8 गुण) यांची कामगिरी बहारदार झाली.
पुण्याने सिंधुदुर्गचा 55-12 असा सहज पराभव केला. रत्नागिरीने छत्रपती संभाजीनगरवर 42-14 अशी मात केली. रत्नागिरीकडून सायली कर्लेकर (2.30 मि. संरक्षण व 2 गुण), ऐश्वर्या सावंत (नाबाद दोन्ही डावात 2, 2 मि. संरक्षण व 4 गुण), सांगलीने जळगावचा 42-2 असा दणदणीत पराभव केला, तर सोलापूरने हिंगोलीवर सहज मात केली.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती
या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाची कर्णधार प्रियंका इंगळे (पुणे), अश्विनी शिंदे (धाराशिव), तसेच भारताचा कर्णधार प्रतीक वाईकर (पुणे), सुयश गरगटे (पुणे), अनिकेत पोटे (मुंबई उपनगर) हे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत खेळाडू सहभागी झाले असून, त्यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढली आहे.







