करिअर कट्टा उपक्रमाला राज्यस्तरीय पुरस्कार

| नागोठणे | वार्ताहर |

राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम घेण्यात आले होते. या उपक्रमांमधून कोएसोच्या नागोठण्यातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयास राज्यस्तरीय विभागीय गटातून द्वितीय क्रमांक मिळाला आणि उत्कृष्ट तालुका समन्वयक म्हणून प्राध्यापक डॉक्टर विलास जाधवर यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.

या उपक्रमाचे पारितोषिक वितरण मुंबई येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयात संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांना उत्कृष्ट महाविद्यालयाचा आणि डॉ. विलास जाधवर यांना उत्कृष्ट तालुका समन्वयक म्हणून प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे संचालक यशवंत शितोळे, के.जे. सोमय्या विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एन. राजशेखरन पिल्लई , सोमय्या ट्रस्टचे सचिव लेफ्टनंट जनरल जगबीर सिंग, सनदी अधिकारी प्रफुल्ल पाठक, महाराष्ट्र शासनाच्या उद्योजकता विकास विभागाचे सचिव नामदेव भोसले, प्राचार्या डॉ. प्रज्ञा प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version