खोपोलीत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोली शहरात रोटरी क्लब ऑफ खोपोली यांच्या मुख्य आयोजनातून 10 वर्षांखालील, 14 वर्षांखालील व खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धा 29 मे रोजी पार पडली. स्पर्धेतील सर्व विजयी खेळाडूंना सन्मानचिन्ह, प्रशिस्तपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत राज्यातील जवळपास 120 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष सुरेश खेडकर, सेक्रेटरी सुरेद्र जोशी, मिलिंद बोधणकर, संजय पाटील, धर्माराज पाटील, रायगड जिल्हा चेस असोसिएशन अध्यक्ष विलास म्हात्रे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. तर, संपूर्ण स्पर्धेचे पंच म्हणून सी.एम. पाटील, स्वप्निल ठिक, सिद्धार्थ ठिक, चंद्रशेखर पाटील, अंकीत जोशी, सार्थक मिंडे, चैतन्य मोहिते, आयुष अभाणी, अ‍ॅड. गोपीनाथ डंगर यांनी काम पाहिले.

बुद्धिबळ खेळाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता निश्‍चितच वाढते, त्याच माध्यमातून स्मरणशक्तीतही वाढ होते म्हणून बुद्धिबळ खेळ खूप आवश्यक असून, जास्तीत जास्त खेळाडूंनी या खेळाकडे वळावे या हेतूने खोपोली शहरात रोटरी क्लब ऑफ खोपोली यांच्या मुख्य आयोजनातून राज्यस्तरीय स्पर्धा रायगड जिल्हा चेस असोसिएशन व महाराष्ट्र राज्य चेस असोसिएशन याच्या मान्यतेतून भरविण्यात आली होती. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रोटरी क्लब ऑफ खोपोलीच्या पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली. तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी यापुढेही रोटरी क्लबच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही अध्यक्ष सुरेश खेडकर यांनी दिली.

Exit mobile version