| मुंबई | प्रतिनिधी |
बंड्या मारुती सेवा मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने दि. 3 ते 6 जाने. या कालावधीत स्थानिक पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखान्यावर होणार्या या स्पर्धेत विजय क्लब, अमर क्रीडा मंडळ, नवोदित संघ, अंकुर स्पोर्ट्स, गुड मॉर्निंग, गोलफादेवी सेवा, विजय नवनाथ, जय भारत, लायन्स स्पोर्ट्स (सर्व मुंबई शहर), अंबिका, उत्कर्ष, स्वस्तिक, सत्यम (सर्व मुंबई उपनगर), मोरया, उजाळा, मावळी, शिवशंकर (सर्व ठाणे), बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन, राकेश घुले मित्र मंडळ, चेतक (सर्व पुणे), बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन-नांदेड, वाघजाई क्रीडा, कोळकेवाडी मंडळ (रत्नागिरी), मिडलाईन- रायगड आदी संघात पुरुष गटात चुरस पहावयास मिळेल. तर महिला गटात, शिवशक्ती, डॉ.शिरोडकर, मुंबई पोलीस, विश्वशांती, स्वामी समर्थ (सर्व मुंबई), महात्मा गांधी (उपनगर), ज्ञानशक्ती, होतकरू, राजर्षी शाहू (सर्व ठाणे), इच्छाशक्ती (पालघर) आदी 12 संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 75 वर्षाकडे वाटचाल करणार्या या मंडळाने या अगोदर देखील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच कबड्डी खेळात देखील या मंडळाने आपला दबदबा निर्माण केला आहे.
पुरुष गटात सहभागी संघाची 8 तर महिला गटात सहभागी संघाची 4 गटात विभागणी करण्यात येणार आहे. मातीच्या 3क्रीडांगणावर सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. सर्व सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील. पुरुषांत अंतिम विजयी संघास आमदार चषक व रोख एक लाख प्रदान करण्यात येतील. उपविजयी संघास चषक व रोख पासष्ट हजार रुपये देण्यात येतील. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख पंचवीस हजार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणार्या खेळाडूस .पंचवीस हजार देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत उत्कृष्ट चढाई व पकडीचा खेळाडूस प्रत्येकी .पंधरा हजार देण्यात येणार आहेत.
महिलांत विजयी होणार्या संघास संघास आमदार चषक व रोख पासष्ट हजार प्रदान करण्यात येतील. उपविजयी संघास चषक व रोख पंचेचाळीस हजार देऊन सन्मानित करण्यात येईल. तर उपांत्य उपविजयी दोन्ही संघास प्रत्येकी चषक व रोख पंधरा हजार देण्यात येतील. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणार्या महिला खेळाडूस रोख पंधरा हजार, सर्वोत्तम चढाई व पकडीच्या खेळाडूस प्रत्येकी रोख दहा हजार प्रदान करण्यात येतील. प्रतिदिनीचा मानकरी ठरणार्या दोन्ही गटातील खेळाडूस सायकल प्रदान करण्यात येईल.
या स्पर्धेच्या उदघाटनास आ. आदित्य ठाकरे, खा.अरविंद सावंत, आ.सुनील शिंदे, आ.सचिन अहिर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत विजयी होणार्या संघावर चार लाख वीस हजार रोख रकमेच्या बक्षिसांची खैरात होणार असून या स्पर्धेत कबड्डी रसिकांना निश्चितच चुरशीच्या लढती पहावयास मिळतील. स्पर्धेच्या वेळीच गटवारी जाहीर करण्यात येईल.
अधिक माहितीकरिता :- अजय चव्हाण 8691854999.