। मुंबई । प्रतिनिधी ।
बजरंग क्रीडा मंडळ अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुरुष स्थानिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. दि.27 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथील संकुलात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत राज्यातील 21 निमंत्रित पुरुष संघांना सहभाग देण्यात येणार आहे.
या स्पर्धेकरिता स्वर्गीय राजाराम परब आणि स्वर्गीय रामचंद्र बागवे यांच्या स्मरणार्थ दोन मातीची क्रीडांगणे तयार करण्यात येणार आहेत. सर्व सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. या स्पर्धेत अडीच लाखापेक्षा अधिक रोख रकमेच्या बक्षीसांची खैरात होणार आहे.
स्पर्धेत अंतिम विजयी होणार्या संघास आकर्षक सुवर्ण चषक व रोख पंचाहत्तर हजार , तर उपविजयी संघास चषक व रोख एकावन्न हजार रुपये प्रदान करण्यात येतील. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख एकवीस हजार देण्यात येतील. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणार्या खेळाडूस रोख रु. पंचवीस हजार देऊन गौरविण्यात येईल. त्याच बरोबर स्पर्धेत उत्कृष्ट ठरणार्या चढाई व पकडीच्या खेळाडूस रोख रु. पंधरा हजार प्रदान करण्यात येतील. त्याच बरोबर प्रतिदिनी उत्कृष्ट खेळ करणार्या खेळाडूस रोख रु. पाच हजार देऊन सन्मानित करण्यात येईल. या स्पर्धेकरिता सुनील शिंदे(अध्यक्ष),शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सिताराम साळुंके कार्याध्यक्ष रमाकांत इंदप यांच्या मार्गदर्शना खाली मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
अशी माहिती मंडळाचे सचिव विलास सकपाळ(8850080133) यांनी एका पत्रकाद्वारे प्रसार माध्यमांना दिली. अधिक माहितीकरिता सिताराम साळुंके (8850647098), कार्याध्यक्ष रमाकांत इंदप (9930326131) यांच्याशी संपर्क साधावा.