माणगाव तालुक्याचा विकास खुंटला
। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हयातील माणगाव तालुक्यातील विकासाला चालना देणारे दोन महत्वाचे प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडल्याने माणगाव तालुक्याचा विकास दिवसेंदिवस खुंटत आहे. याकडे लोकप्रतीनिधिनी पाहणे गरजेचे आहे. माणगाव तालुक्यातील कंभे जलविद्युत व पन्हळघर येथील धरण हे महत्वाचे दोन प्रकल्प रखडले असून हे दोन्ही प्रकल्प सध्या कोमात गेले आहेत. याकडे शासनांनी पूर्णतः डोळे झाक चालवली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात कोकणातील सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावू अशा घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र या प्रकल्पाची स्थिती जैसे-थे राहिल्याने या रखडलेल्या प्रकल्पामुळे माणगाव तालुक्याचा विकास खुटला आहे.
कुंभे जलविद्युत प्रकल्पाला 100 कोटी रू. ची मान्यता मिळाली. व तेथे जाण्यायेण्याच्या रस्त्यासाठी बोगदयासाठी वनविभागाची मान्यता मिळाली. पुढे त्यावेळचे कार्यकारी अभियंता श्री.नी.रे. कारीमुंगी व त्यांच्या सहकार्यांनी हा प्रकल्प फायदेशीर होण्यासाठी काळ आणि कुंभे एकत्र केले. त्यामुळे वीजनिर्मिती बरोबर सिंचन क्षेत्रासाठी व औद्योगिक वसाहतीत पाणी उपलब्ध होईल असा महत्वाकांक्षी प्रकल्प तयार केला. कुंभे धरणाच्या कामास सुरूवात झाली. बोगदा खणून प्रकल्पापर्यंत जाण्याचा रस्ता तयार करण्यात आला.
तृतीय सुधारित प्रशासकीय कुंभे जलविद्युत प्रकल्पासाठी 252 कोटी 37 लाख 51 हजार रूपये खर्चाची प्रशासकीय मंजूरी 6 जानेवारी 2011 रोजी मिळून प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत 200 कोटी 12 लाख 37 हजार रूपये खर्च होउन धरणाचे काम 70 टक्के, सारिका विमोचन 75 टक्के, सांडवा 90 टकके, जलवहन प्रणाली खोदकाम 91 टक्के, विद्युतगृह 10 टक्के इतके काम झाले आहे. कुंभे येथे स.न. 63 टक्के येथे 118 कुटूंबाना प्लॉट दिले. कुंभे जल विद्युत प्रकल्पाचे पुनवर्सन भूसंपादन वनजमिनी हस्तांतरणाचा कामे वगळता उर्वरित सर्व अटक भागाची बांधकामे मे 2015 पासून च्या पत्रान्वये काळ व कुंभे जलविद्युत प्रकल्पाचा एकत्रित खर्च प्रशासकीय मान्यताप्रत खर्चापेक्षा जास्त झाल्याची सबब सांगून स्थापत्य कामावर कोणताही खर्च करणेत येउ नयेत असे निर्देश दिल्यामुळे कुंभे प्रकल्पाचे काम बंद पडले आहे. सर्वच पक्ष मागासलेल्या कोकण विकासाच्या गप्पा मारत असले तरी मागासलेल्या कोकणाचा अनुशेश भरून काढण्याचे आश्वासन देत असले तरी ज्या प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झाले त्यावर 200 कोटी 12 लाख 37 हजार रूपये खर्च झाले. पण सर्व प्रकल्प 30 टक्के राहिलेल्या कामामुळे धूळ खात पडला आहे.
उन्हाळयामध्ये कोकणांत अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, वारंवार वीज खंडीत होणे व यामुळे शेती व उदयोगांची कामे थांबणे म्हणजे विकास कामांना खिळ बसणे हे कोकणवासीयांचे पूर्वापार दुःख आहे. पावसाळयात धुव्वाधार पाउस पडतो. व सर्व पाणी समुद्रास जाउन मिळते. पण हेच पाणी कुंभे सारख्या डोंगरात अडविले तर प्रदुशण विरहीत जलविद्युत प्रकल्पामुळे वर्षभर नियमित कृषी व उदयोगाला विज ते पाणी मिळेल, हे कै. बॅ. अंतुले यांचे स्वप्न होते.
अपूर्ण असलेले पन्हळघर धरण
पन्हळघर धरणाला 8 सप्टेंबर 1971 ला 22 लाख 86 हजार 453 रूपयांची मातीच्या बंधार्याची योजना आखण्यात आली. 14 एप्रिल 1972 रोजी त्याला प्रषासकीय मान्यता मिळाली. प्रत्यक्ष कामास मार्च 1973 मध्ये सुरूवात झाली. जून 2008 मध्ये धरणाचे काम बहुतांशी पूर्ण होउन 3.23 दषलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता. त्यासाठी मातीचे धरण बांधण्यात आले त्याची लांबी 592 मी. उंची सुमारे 20 मी. सांडव्याची लांबी 66 मी. असून या प्रकल्पावर आजपर्यंत म्हणजे 1 जानेवारी 2018 अखेर बांधकामावर 5 कोटी 11 लाख 62 हजार रूपये. तसेच आस्थापनेवर 3 कोटी 11 लाख असे एकूण मुळचे 22 लाख 86 हजार रूपये मंजूरीचे धरणावर 45 वर्षानंतर 8 कोटी 93 लाख 60 हजार रूपये खर्च होवूनही धरण अर्धवट कालव्याच्या कामा अभावी निरूपयोगी ठरत आहे. कारण सदर योजनेवर 267 हेक्टर सिंचन क्षेत्र घोषित होवूनही प्रत्यक्षात 30 हेक्टर सिंचन क्षेत्राची निर्मिती झालेली आहे. भारतातील प्रगतीपथावर असलेले सध्या विकसित होत असलेले व महाराष्ट्राचे तंत्रषास्त्र विद्यापीठ म्हणून नावारूपास येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठास या धरणाच्या अर्धवट कामामुळे सुमारे 9 कोटी रूपये खर्च होवून म्हणावा तसा फायदा होत नाही व सिंचनही होत नाही.