| पोलादपूर | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथील सोमाणी परिसर, वाटाणे लॉन येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन व पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास दिनकरराव वाटाणे, रमाकांत व्यास, गजानंद माऊली, डॉ. विश्वासराव आरोटे, शैलेश पालकर, नयन मोंढे, राजेंद्र कोर्टे पाटील, वैभव स्वामी, नवनाथ जाधव, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व मातोश्री स्नेहलता सोमाणी यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांच्याहस्ते करण्यात आले.
अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान देण्यात आला. भागवताचार्य डॉ. रमाकांत व्यास यांना ‘संत सेवाश्री’, दिनकरराव वाटाणे यांना ‘वारकरी सेवा’, हेमराज लाहोटी, हरीश बाहेती, सरोज बाहेती यांना ‘विदर्भ भूषण’, शिला राठी व माधवराव अंभोरे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध समाजसेवक, उद्योजक, पत्रकार व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार, सन्मानचिन्ह, सुवर्णपदक व विश्व कल्याण प्रार्थना प्रदान करण्यात आली. रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांच्यासह राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले.







