राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा

युवा पलटन,भारत पेट्रोलियम उपांत्य फेरीत; अंतिम सामना होणार चुरशीचा

| मुंबई | प्रतिनिधी |

युवा पलटन, ठाणे महानगर पालिका, भारत पेट्रोलियम, मुंबई पोस्टल यांनी ओम्‌‍‍ ज्ञानदीप मंडळाने आयोजित केलेल्या या हंगामातील पहिल्या पुरुष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली.

युवा पलटन वि. ठाणे महानगर पालिका, भारत पेट्रोलियम वि. मुंबई पोस्टल अशा प्रथम उपांत्य लढती होतील. त्यानंतर अंतिम सामना होईल. मुंबई, आदर्श नगर येथील वरळी स्पोर्टस्‌‍‍ क्लबच्या मैदानावरील स्व. अमित वजराटकर क्रीडानगरीतील मॅटवर झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत युवा पलटन संघाने मीरा भाईंदर महानगर पालिकेचा 44-23 असा पाडाव केला. आक्रमक खेळ करीत पूर्वार्धात 2 लोण देत युवा पलटनने 27-10 अशी भक्कम आघाडी घेतली. भारत पेट्रोलियमने पुण्याच्या डी. पी. यु. चा 39-25 असा पाडाव केला.

मध्यंतरला 23-18 अशी आघाडी पेट्रोलियम संघाकडे होती. अनिल जस्ता, आदित्य चौघुले, हर्ष लाड, प्रदीप दिघोळ भारत पेट्रोलियम कडून, तर विकास जाधव, राहुल वाघमारे, हर्षद माने डी. पी. यु. कडून उत्कृष्ट खेळले. शेवटच्या सामन्यात मुंबई पोस्टलने मिडलाईन अकॅडमी वर 51-46 अशी मात केली. अभिराज पवार, अभिषेक भोजने यांच्या चढायांना ओमकार मोरेची मिळालेली पकडीची साथ यामुळे पोस्टलने पहिल्या डावात 2 लोण देत 28-18 अशी आघाडी घेतली होती.
दुसऱ्या डावात सुशील काबरेकर, साईप्रसाद यांनी आपला खेळ उंचावत 2 लोण देत खेळ रंगतदार अवस्थेत आणला. पण उत्तरार्धात आणखी एक लोण देत पोस्टलने आपला विजय निश्चित केला.

Exit mobile version