रोहा एसटी स्थानकात अत्याधुनिक स्वच्छता यंत्रणेचे लोकार्पण

नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्या हस्ते शुभारंभ

। चणेरा । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) गेली तब्बल 78 वर्षे महाराष्ट्रातील दुर्गम खेड्यापाड्यांपासून शहरांपर्यंत नागरिकांना अखंड प्रवासी सेवा देत आहे. 1 जून 1948 रोजी सुरू झालेली ‘लाल परी’ आजही लाखो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरली आहे. बदलत्या काळानुसार प्रवासी सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याच्या दिशेने महामंडळाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत रोहा एसटी स्थानकात अत्याधुनिक स्वच्छता यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

रोहा बस स्थानक येथे आधुनिक स्वच्छता साहित्य व यांत्रिक उपकरणांच्या लोकार्पणाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्या शुभहस्ते या अत्याधुनिक उपकरणांचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे रोहा बस स्थानकातील स्वच्छतेच्या दर्जामध्ये मोठी सुधारणा होणार असून प्रवाशांना अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुखद वातावरण उपलब्ध होणार आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती अहमद दर्जी, सार्वजनिक बांधकाम व अपंग कल्याण सभापती राजेंद्र जैन, पाणीपुरवठा व दिवाबत्ती सभापती महेंद्र दिवेकर, शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सभापती रवींद्र चाळके, पर्यटन, पर्यावरण व नियोजन सभापती महेश कोलटकर, गटनेते महेंद्र गुजर, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, समाजसेवक प्रषित बारटक्के, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील धनावडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि मोठ्या संख्येने रोहेकर नागरिक उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. त्यांच्या नेतृत्वाखाली आगारात स्वच्छता, शिस्त आणि प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असून, या आधुनिक स्वच्छता यंत्रणेची भर पडल्याने स्थानकाच्या देखभालीला नवे बळ मिळणार आहे.

या नव्या यंत्रणेमुळे स्थानक परिसरातील स्वच्छता अधिक परिणामकारक, जलद आणि नियमित राखणे शक्य होणार आहे. याचा थेट लाभ दररोज हजारो प्रवाशांना मिळणार असून स्थानकातील आरोग्यदायी वातावरण, स्वच्छ परिसर आणि प्रवाशांचा समाधानकारक प्रवास याला चालना मिळणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

“स्वच्छता हीच सेवा, स्वच्छता म्हणजे आरोग्य धनसंपदा” हा संदेश देत रोहा एसटी स्थानकाने आधुनिकतेकडे आणि गुणवत्तापूर्ण प्रवासी सेवेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकल्याचे या सोहळ्यात अधोरेखित करण्यात आले. भविष्यातही प्रवाशांच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Exit mobile version