एक मुख्याध्यापक, तीन सहाय्यक शिक्षकांचा होणार सन्मान
| रायगड | प्रतिनिधी |
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2022-23 मिळविलेल्या 108 शिक्षकांची यादी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारावर रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तीन सहाय्यक शिक्षकांनी, तर माध्यमिक विभागात एक मुख्याध्यापक यांनी नाव कोरले आहे. माध्यमिक शाळेवरील एक मुख्याध्यापक आणि प्राथमिक शाळांवरील सहाय्यक शिक्षकांमध्ये गाईड शिक्षक, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक यांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक दिनी मुंबईत होणार आहे.
राज्य शिक्षक पुरस्कारांच्या निवड यादीत रायगड जिल्ह्यतील प्राथमिक विभागातील तीन सहाय्यक शिक्षक तर माध्यमिक विभागात एक मुख्याध्यापक यांची वर्णी लागली आहे. यामध्ये प्राथमिक विभागात अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा हटाळे येथील सहाय्यक शिक्षक संदीप दत्तात्रेय वारगे यांची निवड करण्यात आली आहे. माध्यमिक विभागात पनवेल तालुक्यातील सु.ए.सो. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोलीचे मुख्याध्यापक राजेंद्र बाजीराव पालवे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सन 2022-23 यावर्षीचा राज्य शिक्षक पुरस्कार कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा मालेगाव येथील सहाय्यक शिक्षक शरद महादेव नागटिळक यांना घोषित करण्यात आला आहे. उत्कृष्ट गाईड शिक्षक म्हणून रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा वराठी येथील सहाय्यक शिक्षिका वर्षा हिरामण दळवी यांची राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.