रोहा शेकापच्या वतीने गॅस व पेट्रोलजन्य वस्तूंच्या दरवाढीविरोधात निवेदन

रोहा | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी गॅस, पेट्रोल, डिझेल या वस्तूंच्या दरवाढीविरोधात सर्व तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्याची सूचना केली होती. रोहा तालुक्यात जिल्हा महिला आघाडी सदस्या कांचन माळी, पुरोगामी युवक संघटना तालुका उपाध्यक्ष नंदेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन नायब तहसीलदार मोरजकर यांना देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळावी यासाठी उज्ज्वला योजना आणली. पण, गॅस दरवाढीमुळे ग्रामीण जनतेला गॅस सिलिंडर खरेदी करणे दुरापास्त झाले आहे. त्याचप्रमाणे केंद्रातील भाजप सरकारने गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी सबसिडीदेखील बंद केल्याने मध्यमवर्गीय जनता मेटाकुटीला आली आहे. कोरोना, चक्रीवादळे, महापूर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उत्पन्नाची साधने हिरावली गेली आहेत. महागाई वाढली आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांचा प्रवास महाग झाला असून, मालवाहतुकीचे दर वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरातदेखील वाढ झाली आहे. केंद्र व राज्य शासनाने गॅस, पेट्रोल, डिझेल या वस्तूंची दरवाढ कमी करावी याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी शेकापकडून निवेदन देण्यात आले आहे. शासनाने सदर दरवाढ कमी न केल्यास शेकापच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा महिला आघाडी सदस्या कांचन माळी यांनी दिला आहे.
याप्रसंगी कांचनताई माळी सदस्य जिल्हा महिला आघाडी, विनया चौलकर तालुका महिला आघाडी चिटणीस, परशुराम वाघमारे रोहा तालुका खजिनदार, नंदेश यादव पुरोगामी युवक उपाध्यक्ष, गणेश खरीवले सरपंच, खेळू ढमाल, दिलीप म्हात्रे, विलास म्हात्रे, शशिकांत कडू, दीपक माळी, अभिषेक शिंगरे, संजय चाळके, राजेश्री दाभाडे, संजीवनी चाळके, निखिल मढवी, तानाजी म्हात्रे, मंगेश ढमाल, सुबोध देशमुख, नितीन राजीवले उपस्थित होते.

Exit mobile version