डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह जमीनसाठी निवेदन

| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुउद्देशीय सभागृह उभारणीसाठी शासकीय जमीन मिळावी यासाठी प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांना प्रांताधिकारी कार्यालय माणगाव येथे सोमवार दि.18 एप्रिल रोजी सकाळी बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज रवींद्र तांबे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष सचिन गंगावणे,सुभाष होवाळ,अशोक सखाराम गायकवाड,नांगचंद सावंत,जनार्दन सावंत,मनोहर जाधव, कमलाकर गंगावणे, स्वप्नील शिर्के, रामदास सावंत, ललीचंद सावंत, सुंदर गायकवाड, दीपक शिर्के यांनी निवेदन दिले.

या निवेदनाची प्रत माहितीकरिता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री रायगड, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री, रायगडचे खासदार, रायगड जिल्हाधिकारी,जिल्ह्यातील सर्व आमदार यांना पोस्टाने रवाना करण्यात आले आहे. सदर निवेदनात असे म्हटले आहे कि, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. डॉ.आंबेडकर या थोर पुरुषांचे विचार समाजात तळागाळात पोहचविण्यासाठी तसेच आमचे निजामपूर व त्या विभागातील तमाम बौद्ध बांधवांसह बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांचे प्रबोधन विविध सामाजिक उपक्रम, शिबिरे, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विचार रुजविण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त अशा प्रशस्त जागेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुद्देशीय सभागृह उभा करण्याचा निजामपूर विभाग बौद्ध बांधवांच्या वतीने व आम्रपाली बौधिष्ठ मित्रमंडळ निजामपूर माणगाव तालुक्याच्या वतीने मानस आहे.या महामानवाच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या भागातील तमाम नागरिकांना निजामपूर येथे भवन उभारण्याची इच्छा आहे.यासाठी आपण आम्हाला शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी अशी आमची आग्रहाची विनंती असून आमच्या मागणीचा विचार करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृह साकारण्यासाठी आम्हाला शासकीय जागा मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version