नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
। तळा । वार्ताहर ।
बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी तळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. अवकाळी पावसामुळे भातशेती, पेंढा तसेच कडधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
कोकणात आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मागील वर्षी रायगड जिल्ह्यात पिक विमा हप्त्याची झाडामागे रक्कम 70 रुपये होती. मात्र यावर्षी तीच रक्कम चार पटीपेक्षा अधिक वाढली असून प्रतिझाड 294 रूपये करण्यात आलेली आहे. मागील दोन वर्षात दोन वेळा कोकणाने वादळाचा सामना केला आहे. त्यामुळे मुळातच येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. अशातच पिक विमा हप्त्याच्या रकमेत वाढ करण्यात आल्याने एकप्रकारे आंबा उत्पादकांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे पिक विम्याची वाढीव रक्कम रद्द करून पूर्वीप्रमाणे 70 रुपये करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. याप्रसंगी संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष भास्कर गोळे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.