। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात रविवारी (दि.13) महाराष्ट्रातील प्रागतिक पक्षाची संयुक्त बैठक संपन्न झाली. यामध्ये बुधवारी (दि.16) नाशिक येथे भव्य राज्यव्यापी परिषद आयोजित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
नाशिकमध्ये होणार्या परिषदेत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पर्यायी जनताभिमुख धोरणे जाहीर करावीत आणि प्रागतिक पक्षांसोबत जागा वाटपाबाबत सन्मानपूर्वक तडजोड करावी, अशी आग्रही मागणी करण्यात येईल. महाराष्ट्रभरातून हजारों लोक या परिषदेत सहभागी होतील. पर्यायी जनताभिमुख धोरणे स्वीकारल्यास आणि सन्मानपूर्वक तडजोड झाल्यास महाविकास आघाडी जास्त मजबूत व्हावी, यासाठी ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेतृत्वासोबत चर्चा करण्यासाठी माजी आ. जयंत पाटील, आ. अबू असीम आझमी, डॉ. अशोक ढवळे व डॉ. भालचंद्र कानगो या चार सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली. या बैठकीत शेतकरी कामगार पक्षातर्फे माजी आ. जयंत पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव व राजेंद्र कोरडे, समाजवादी पक्षातर्फे मेराज सिद्दीकी व राहुल गायकवाड, भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे डॉ. भालचंद्र कानगो, सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी, राजू देसले, प्रा. राम बाहेती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, डॉ. एस. के. रेगे, शैलेंद्र कांबळे, आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे किशोर ढमाले हजर होते.