रेल्वे सुविधांबाबत स्थानक सल्लागार समिती आग्रही

रेल्वे अधिकार्‍यांसमवेत चर्चा

| पनवेल | प्रतिनिधी |

सेंट्रल रेल्वेच्या पनवेल स्टेशन कन्सल्टिटेटिव्ह कमिटीची बैठक स्टेशन मास्तर यांच्या दालनात संपन्न झाली. चालू वर्षातील ही अखेरची बैठक होती. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत स्थानक सल्लागार समितीने सुचविलेल्या प्रत्येक मुद्द्यावर विस्तृत चर्चा संपन्न झाली.

या बैठकीला विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा, पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा स्थानिक सल्लागार समिती सदस्य डॉ. भक्तीकुमार दवे, सचिव श्रीकांत बापट, उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, एरिया मॅनेजर ए राजेश, स्टेशन मॅनेजर जगदीश प्रकाश मीना, कमर्शियल स्टेशन मॅनेजर सुधीर कुमार, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. मधुकर आपटे, मंदार दोंदे, निलेश जोशी, विलास दातार, संतोष पाटील, सुनील रानडे, रेल्वे प्रशासनाच्या वतीने एपी मीना, आनंदकुमार,पी एन पाईकराव, सीआरपीएफचे जसबीर राणा, जनरल रेल्वे पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी, एस व्ही मोंढे, आर के नायर,एल एच डोरके, राजेश सिंग आणि असिस्टंट आरटीओ गजानन ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत दादर सावंतवाडी आणि दादर रत्नागिरी या गाड्या रसायनी स्थानकावर थांबल्या पाहिजेत अशी आग्रही भूमिका स्थानक सल्लागार समितीने मांडली, तर दुसर्‍या झोन मधील अधिकारी पनवेल गोरखपुर गाडी सुरू करू शकत असतील तर आपण देखील अन्य झोन करता गाड्या सुरू करण्यास आग्रही राहिले पाहिजे असा युक्तिवाद दवे यांनी केला. अहमदाबाद चेन्नई, पनवेल पुणे पॅसेंजर, लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुबळी व्हाया पनवेल कर्जत सोलापूर या गाड्या सुरू करण्याबाबत स्थानक सल्लागार समिती बैठकीत मागणी करण्यात आली.

या बैठकी करता पनवेल महानगरपालिकेच्या वतीने विनंती अर्जाची आणि निमंत्रणाची कुठलीही दखल घेतली गेली नाही. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती आणि प्रवासी बांधवांना भेडसावणार्‍या समस्येचे निराकरण करण्याकरता मनपा प्रतिनिधींनी दांडी मारली. स्थानिक सल्लागार समितीच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांच्या निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर दीपक शर्मा यांनी विस्तृत चर्चा केली. संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना या बैठकीमध्ये पाचारण करण्यात आले होते. अत्यंत शांत पद्धतीने संयम राखत दीपक शर्मा यांनी प्रत्येक सूचनेचे पृथक्करण केले.

मी दीपक शर्मा यांचे अभिनंदन करतो तसेच त्यांचे आभार देखील मानतो. कारण आजपर्यंतच्या माझ्या स्थानक सल्लागार समितीच्या बैठकांच्या अनुभवाचा विचार केला असता आजची बैठकी अत्यंत सकारात्मक मुद्देसूद आणि सखोल स्वरूपाची झाली. केवळ सूचना आणि तक्रारी यावर भर न देता सोल्युशन मोडवर आज चर्चा झाल्यामुळे प्रवासी बांधवांना आजच्या बैठकीचा निश्‍चितच फायदा होईल.

डॉ. भक्तिकुमार दवे
सल्लागार समिती सदस्य
Exit mobile version