मूळ शिवसेनेसोबत राहिल्याने तिसर्‍यांदा खासदार होणार

संजय जाधवांना आत्मविश्‍वास

| परभणी | वृत्तसंस्था |

मध्यंतरी शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली पण आम्ही मूळ शिवसेनेसोबतच राहिलो. मूळ शिवसेनेसोबत राहिल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि मूळ शिवसेनेत राहिल्यामुळेच मी आज तिसर्‍यांदा खासदार म्हणून निवडून येत आहे. जर मी शिवसेना सोडली असती तर मी मोठ्या फरकाने या लोकसभा निवडणुकीमध्ये हरलो असतो. तसेच मला परभणी लोकसभा मतदारसंघातून भाजपने मला तिकीटही मिळू दिलं नसतं, असा ठाम विश्‍वास परभणी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.

संजय जाधव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातील स्थितीचे वर्णन करत जाधव म्हणाले की, 2024 ची परभणी लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळी होती. कारण या निवडणुकीमध्ये चक्क ओबीसी विरुद्ध मराठा असे मताचे ध्रुवीकरण करण्यात आले. महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्याचा बेस काय? असा सवाल ही संजय जाधव यांनी उपस्थित केला. तसेच महादेव जानकर यांनी विकासाच्या मुद्द्यावर जर परभणी लोकसभा निवडणूक लढली असती तर त्यांचे डिपॉझिट ही जप्त झाले नसते. ओबीसी मराठा असे ध्रुवीकरण केल्यामुळे केवळ लाज राखण्यापुरते तरी मते जानकारांना पडतील, अशी अपेक्षा करतो, असेही संजय जाधव म्हणाले.

Exit mobile version