| रत्नागिरी | प्रतिनिधी |
कोकणातील काही प्रमुख लढतींमध्ये शिवसेनेचे नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मंडळ विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ते महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. योगेश कदम यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या मालमत्तेची गुंतवणुकीची माहिती दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या कार्यालयात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. पाच वर्षांमध्ये आ. योगेश कदम यांच्या जंगम मालमत्तेत 4 कोटी 63 लाख, स्थावर मालमत्तेत 39 कोटी 31 लाख रुपयांची वाढ झाल्याचे दिसत आहे. पण, याच वेळी कर्जातही 11 कोटी 52 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
योगेश कदम यांच्या मालकीची 7 कोटी रुपयांची तर त्यांच्या पत्नीच्या नावे 6 कोटी 60 लाख 99 हजार रुपये, मुलांच्या नावे 39 लाख 70 हजार 66 रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे. जंगम मालमत्तेत रोख रुपये 8 लाख 99 हजार, बँकेमधील गुंतवणूक व शेअर्समधील गुंतवणूक 3 कोटी 69 लाख 819 रुपये असून 33 लाख 50 हजार रुपये किमतीची वाहने आहेत. 1 कोटी 43 लाख 54 हजार रुपये इतके सोन्याचे दागिने आहेत. कुटुंबाची एकत्रित जंगम मालमत्ता 14 कोटी 1 लाख 5 हजार 421 इतकी आहे.
योगेश कदम यांच्या नावे शेतजमीन, बिगरशेतजमीन, व्यावसायिक व निवासी अश्या स्थावर मालमत्तेची एकूण किंमत 41 कोटी 98 लाख 28 हजार इतकी आहे. कदम व त्यांच्या कुटुंबियांनी 15 कोटी 70 लाख 33 हजार इतक्या रक्कमेचे कर्ज घेतले आहे. योगेश कदम यांनी 2023-2024 या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या आयकर विवरण पत्रात 83 लाख 96 हजार 260 इतके उत्पन्न दाखविले असून त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 18 लाख 79 हजार 380 इतके आहे. योगेश कदम यांनी शेती, सल्लागार आणि भूविकासक असे व्यवसाय करत असून पत्नी सिनेमा निर्माता असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. योगेश कदम हे तामिळनाडू राज्यातील अलगप्पा विद्यापीठाचे पदवीधर असून त्यांनी 2017 मध्ये बी.कॉम ही पदवी मिळवली असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.







