प्रदूषण रोखण्यासाठी एकमुखी निर्णय
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा सण…आनंदाचा क्षण. दिवाळीत नवे कपडे, फराळची रेलचेल असते. जोडीला असते ती फटाक्यांची आतषबाजी. फटाक्यांमुळे क्षणिक आनंद मिळतो. मात्र, त्यातून ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण होते. ते रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील एका गावाने फटाकेबंदीचा एकमुखी निर्णय घेतला. वाढते प्रदूषण, तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कौतुकाचा, चर्चेचा विषय ठरला आहे.
दापोलीतील टाळसुरे ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा 0.5’ मोहीम यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेंतर्गत जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत फटाकेबंदीचा निर्णय घेण्यात आला असून, गावातील प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन फटाकेबंदीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गावात फटाके फोडण्यास आणि विक्री करण्यासही बंदी आहे. याबाबतच्या जनजागृती फेर्यांमध्ये विद्यार्थी, महिला सहभागी होत आहेत. या मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती टाळसुरे ग्रामपंचायत अधिकारी दिनेश मर्चंडे यांनी दिली.
गावच्या सरपंच पूर्वा सकपाळ, उपसरपंच विकास जाधव, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली फटाकेबंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी सांगितले. ध्वनी, हवा प्रदूषण रोखण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. फटाक्यांवर होणार्या खर्चातून शैक्षणिक साहित्य, कपडे खरेदी आणि गरजू व्यक्तींना मदत करण्याचा संकल्प गावाने केला आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाद्वारे चांगला सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहोचत असल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे.