माणगावमध्ये स्फोटकांचा साठा जप्त

तीन जणांना अटक, चार पथके तैनात

| माणगाव | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये 1500 किलो वजनाचे जिवंत जिलेटीन आणि 70 किलो वजनाच्या डेटोनेटरचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सदरची स्फोटके पुणे येथून आणल्याचे समोर आले असून पोलिसांनी तपासासाठी चार पथके तैनात केले आहेत, अशी माहिती रायगडचे पेोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

विक्रम गोपाळदास जाट, विठ्ठल तुकाराम राठोड, राजेश सुभेसिंग यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोमवारी सर्वत्र नाताळचा सण तसेच नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. याच कालावधीत स्फोटके सापडल्याने घातपाताचा कट होता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना माणगाव तालुक्यात स्फोटके येणार असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक सतीश आस्वर यांच्यासह काही निवडक पोलिस कर्मचाऱ्यांचे गस्ती पथक तैनात करण्यात आले. निजामपूर भागात गस्त सुरू असताना एक टेप्मो संशयीतरीत्या आढळून आली. चालकाजवळ चौकशी केली असता त्यामध्ये सुमारे 1500 किलो वजनाचे जिवंत जिलेटीन असलेले 50 बॉक्स व 70 किलो वजनाच्या डेटोनेटरचे 4 बॉक्स असल्याचे समोर आले. जिलेटीन तसेच डेटोनेटरची वाहतूक पुणे येथून करण्यात आली. मात्र, त्यासाठी आवश्यक असणारा परवाना अथवा कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. स्फोटके जप्त करून अधिक चौकशी केली असता पाली येथील एका इसमाला जिलेटीन बॉक्स दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सुमारे 14 लाख रूपये इतक्या किंमतीचा माल जप्त केला.

पोलिसांनी पकडलेले जिवंत जिलेटीन हे कोणत्याही सरकारी कामाकरिता आणण्यात आले नसल्याची खात्री केली असून ते विनापरवाना बेकायदेशीर वाहतूक करून आणले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती घार्गे यांनी दिली.

Exit mobile version