लोहारेत विदेशी मद्याचा साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
कारसह 3.85 लाखांचा मुद्देमाल जप्त

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण येथून भरधाव वेगाने महाडच्या दिशेने गेलेल्या गोवा राज्यनिर्मित देशी विदेशी दारूचा मोठा साठा घेऊन निघालेल्या मारूती ऑम्नी कारचा पाठलाग करताना पोलादपूर तालुक्यातील तुर्भे पुलाजवळ लोहारे गावाच्या हद्दीमध्ये एका गोडाऊनमध्ये मुद्देमाल उतरविताना राज्य उत्पादन शुल्क महाड विभागाच्या अधिकार्‍यांनी चाणाक्षपणे धाड घालून मारूती ऑम्नी कारसह 3.85 लाखांचा मुद्देमाल जप्त करताना दोन व्यक्तींनाही अटक केली आहे.
महाड राज्य उत्पादन शुल्क विभागास खात्रीशीर खबर मिळाल्यावरून पोलादपूर येथे एका वाहनावर पाळत ठेवण्यात आली होती. चिपळूणच्या दिशेने एक मारूती ऑम्नी कार (एमएच 08 सी 0230) निघालेली पाहून अडविण्याचा प्रयत्न केला असता कार वळसा घेत पुन्हा महाडच्या दिशेने भरधाव वेगाने निघाली. या भरधाव कारचा पाठलाग केल्यानंतर या कारमधील मुद्देमाल एका गोडावूनमध्ये उतरविण्याचे काम सुरू झाल्याचे दिसून आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्काच्या महाड विभागाने हा मुद्देमाल ताब्यात घेताना मारूती ऑम्नी व्हॅन आणि गोल्ड ऍण्ड ब्लॅक रम 750 मिली क्षमतेच्या 36 बाटल्या, ब्लू सेव्हन व्हिस्की 750 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या, गोल्डन एस व्हिस्की 750 मिली क्षमतेच्या 456 बाटल्या असा 3 लाख 85 हजार रूपये किंमतीचा माल जप्त केला.
यावेळी रेवतळे, चिपळूण येथील व्यंकटेश मधुकर महाडीक वय 39 आणि कुंभारआळी महाड येथील रमेश अनंत गायकवाड वय 48 या दोघांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये निरिक्षक प्रवीण सोनावणे, दुय्यम निरिक्षक शंकर जाधव तसेच जवान सुरेंद्र महाले आणि चेतन भोई यांनी सहभाग घेऊन कारवाई यशस्वी केली.

Exit mobile version