मुरुडमध्ये मिरवणुकीवर दगडफेक; विसर्जनाला गालबोट

भोगेश्‍वर पाखाडीच्या मिरवणुकीदरम्यान घटना; घटनेमागचा खरा सूत्रधार कोण? नागरिकांमध्ये चर्चा

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील भोगेश्‍वर पाखाडी येथील गौरी-गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. दोन अल्पवयीन मुलांकडून विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना गुरुवारी (दि. 12) घडली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुरुड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. रायगड जिल्ह्यात सर्वधर्मीय गेली कित्येक वर्षे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. विविध सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करीत आहेत. परंतु, निवडणुका तोंडावर आल्या असताना अशा पद्धतीचे दोन समाजात वितुष्ट निर्माण करण्याचे काम काही समाजकंटकांकडून करण्यात आले आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान भोगेश्‍वर पाखाडीतून गौरी-गणपती मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत येत होती. यावेळी गणेशभक्त नाचगाण्यात दंग झाले होते. दरम्यान, ही मिरवणूक जगदीश पाटील यांच्या निवासस्थानाजवळील रस्त्यावरुन जात असताना अचानक शेजारील कंपाऊंडमधून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, गणेशभक्त महिला प्रिता चौलकर यांच्या बाजूने एक दगड आला, तद्नंतर दुसरा दगड वैशाली म्हात्रे यांच्या हाताला जोरदार लागला. सतत दगड आल्याने गणेशभक्तांनी दगड येणार्‍या कंपाऊंडमध्ये गेट उघडून घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, गेटला आतून कडी असल्याने ते उघडता आले नाही. शेवटी आळीतील मुलांनी कंपाऊंडवर चढून आत प्रवेश केला. त्यावेळी दोन लहान मुले जाणूनबुजून मिरवणुकीवर दगड मारत असल्याचे निदर्शनास आले.

आम्हाला पाहून ती मुले पळून गेली. परंतु, या दगडफेकीत अनेक महिला जखमी झाल्या असून, काहींना मुका मार लागला आहे. ही बातमी मिळताच तात्काळ मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मिरवणुकीत सहभागी असणार्‍या गणेशभक्तांना शांत राहण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या आवाहनानंतर वातावरण शांत झाले, त्यानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली. पोलीस बंदोबस्तात बाप्पांचे विसर्जन पार पडले. त्यानंतर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने याविषयी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात येण्याचे आवाहन मुरुड पोलिसांकडून करण्यात आले होते. परंतु, पोलिसांकडून सकाळपर्यंत त्या दोन्ही मुलांवर, तसेच या कृत्यास प्रोत्साहन देणार्‍या त्यांच्या पालकांवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने होत नसल्याने सकाळच्या दरम्यान शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना घेराव घालून जाब विचारला. दोन्ही मुलांना, पालकांना अजूनपर्यंत अटक का झाली नाही? त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली. परंतु, सकाळपासून तीन तास होऊन गेले तरी कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करु, असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, भारत माता की जय, जय श्रीराम’च्या घोषणांनी पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून गेला. यावेळी अलिबाग विभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु, नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने त्या मुलांना, त्यांच्या पालकांना अटक करा, अशा घोषणा नागरिकांकडून सारख्या-सारख्या येत असल्याने परिसर पुन्हा दुमदुमून गेला.

अखेर पोलिसांनी तक्रार नोंद घेण्यास सुरुवात केली. तद्नंतर नागरिक शांत झाले. दरम्यान, घरातून आवश्यक असेल तर बाहेर पडा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेने मुरुड शहरातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुरुड शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या घटनेमागे कोण?
मुरुडमध्ये गेली अनेक वर्षे सर्वधर्मीय आनंदाने वास्तव्य करीत आहेत. सर्व सण-उत्सवात नेहमीच एकोपा दिसून आला आहे. कोणत्याही सणाला गालबोट लागल्याचे ऐकिवात नाही. असे असताना इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच असे काही झाले की, दोन समाजांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या उत्सवाला गालबोट लावण्यात आले. तर, याच्या मागे नेमके कोण आहे? कुठल्या तरी प्रतिगामी शक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असून, राजकारणाचा वापर त्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, भांडणे लावण्यासाठी केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक आमदार आहेत कुठे?
भारतीय संस्कृतीतील विविध सण एकत्रितपणे साजरे करणार्‍या मुरुडमध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत जाणूनबुजून गालबोट लावण्याचा प्रयत्न प्रतिगामी शक्तींनी केल्याचे मुरुडकर सांगत असताना दोन समाजांमधील ही तेढ मिटविण्यासाठी त्यांचे स्वघोषित पालकत्व स्वीकारणार्‍या स्थानिक आमदारांनी मात्र मुरुडमधील या घटनेनंतर तातडीने जाणे टाळले असल्याचे चित्र गणेश विसर्जनाच्या दिवशी दिसले. यामुळे दोन्ही समाजातील नागरिकांच्या आशांवर पाणी पडले.
Exit mobile version