उद्या दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप
| अलिबाग । प्रमोद जाधव ।
निरोप देतो देवा आज्ञा असावी,
चुकले आमचे काही देवा क्षमा असावी…
गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाभर मंगलमय, चैतन्यदायी वातावरणात गणेशोत्सव सुरू आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे गणरायाला आवाहन करुन जड अंतःकरणाने भावपूर्ण निरोप देण्याची वेळ समीप आली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. उद्या मंगळवारी (दि.17) अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यासाठी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे.
गणपती बाप्पा जसे वाजत-गाजत येतात, तसेच धूमधडाक्यात जातात. जिल्हाभर गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सर्वत्र उत्साहाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. या मंगलमूर्तीच्या आनंदोत्सवात सर्वजण सहभागी झाले होते. सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी तर हा उत्सव मोठ्या मानाचा असतो. प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी झटत असतो. मंडळांनी यंदा तयार केलेले देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, आता गणरायाच्या निरोप देण्याची तयारी सुरू झाली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये 17 हजार 359 गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामध्ये 144 सार्वजनिक व 17 हजार 359 घरगूती गणेशमूर्तींचा समावेश आहे. सायंकाळी पाचनंतर मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. काही ठिकाणी डिजेच्या तालावर, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीचा सोहळा जल्लोषात साजरा करता यावा यासाठी मंडळांकडून तयारी करण्यात आली आहे.
आवाजावर राहणार पोलिसांचे लक्ष
दहा दिवसांच्या बाप्पाला मंगळवारी निरोप दिला जाणार आहे. मिरवणूक सायंकाळी निघणार आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी डिजे व स्पीकरच्या माध्यमातून गाणी लावली जाणार आहेत. परंतु, इतर नागरिकांना त्रास होऊ नये, ध्वनीप्रदूषण होऊ नये यासाठी रायगड पोलिसांमार्फत आवाजाची क्षमता मोजण्याचे यंत्र पोलीस ठाण्यात उपलब्ध असून, दिलेल्या नियमानुसार आवाज ठेवूनच गाणी वाजविण्यात यावी, अशी सूचना पोलिसांकडून मंडळांना देण्यात आली आहे. डिजे व अन्य वाद्यांच्या आवाजावर पोलिसांचे लक्ष राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
मिरवणूक सोहळा आनंदमय व शांततेत पार पाडावा यासाठी मंडळांशी समन्वय साधण्याचे काम स्थानिक पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. लेझरच वापर करू नये, याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. मिरवणूक मार्ग पाहिले असून, विसर्जन घाटची पाहणी केली आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवला जाणार आहे. नागरिकांनी हा सोहळा आनंदात साजरा करावा.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड