| मुंबई | प्रतिनिधी ।
उपनगरीय लोकलवर दगडफेकीच्या घटना सुरूच आहेत. रे रोड रेल्वे स्थानकात झालेल्या दगडफेकीत 28 वर्षीय प्रवासी तरुणी जखमी झाली. आठवड्याभरतील ही तिसरी घटना आहे. या तरुणीवर केईएम रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मुंबई उपनगरीय लोकलमधून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र, अधूनमधून काही भागांतून लोकलवर दगडफेकीच्या घटना घडतात. या घटनांमुळे प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अनेकांना डोक्याला किंवा डोळ्याला इजा झाल्याच्या नोंदी आहेत. शिवडी आणि वडाळा रेल्वे स्थानकात धावत्या लोकलवर दगडफेकीच्या दोन घटना ताज्या असताना शुक्रवारी रे रोड आणि कॉटन ग्रीन स्थानकांदरम्यान धावत्या लोकलवर दगडफेकीची आणखी एक घटना घडली. या घटनेत 28 वर्षीय महिला प्रवासी जखमी झाली. एकाच आठवड्यात लोकलवर दगडफेकीची ही तिसरी घटना आहे.
परळ येथे वास्तव्यास असलेली 28 वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. तिने शुक्रवारी संध्याकाळी सीएसएमटी गोरेगाव हार्बर मार्गावरील धीमी लोकल पकडली होती. मोटरमनजवळील महिलांच्या डब्यातून ती प्रवास करीत होती. रे रोड स्थानक जातात ती कॉटन ग्रीनला उतरण्यासाठी दरवाज्याजवळ आली. अचानक लोकलच्या दिशेने भिरकावलेला दगड तिच्या डोक्याला लागला. कॉटन ग्रीन स्थानकातील स्टेशन मास्तरांनी तिच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित प्रवासी महिला उपचारानंतर पोलीस ठाण्यात गेली आणि तिने याप्रकरणी तक्रार केली. तिच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वडाळा रेल्वे पोलिसांनी सांगितले.







