माथेरान-नेरळ घाटात कोसळली दरड

पालकमंत्री यांच्या दौर्‍यामुळे रस्ता केला मोकळा
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान-नेरळ राज्यमार्गावरील माथेरान घाटात शुक्रवारी (दि.18) पहाटे दरड कोसळली. या दरडीमुळे सकाळच्या वेळी नोकरीसाठी तरुण आणि विद्यार्थी यांची काहीशी गैरसोय झाली. मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचा माथेरान दौरा असल्याने सकाळीच दरड रस्त्यातून बाजूला करण्यात आली.

माथेरानच्या दस्तुरी नाका येथून पुढे 200 मीटर अंतरावर असलेल्या चांगभले मंदिर भागात शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळली. भाजीपाला आणण्यासाठी माथेरान येथून बाहेर पडणारी वाहने यांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित करण्यात केले आणि त्यामुळे सकाळीच दरड बाजूला करण्याचे काम जेसीबी मशीन लावून करण्यास सुरुवात झाली. त्यात जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे या माथेरान दौर्‍यावर येणार होत्या. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळी 10 वाजण्याच्या अगोदर रस्त्यावरून दरड बाजूला केली. यावर्षी पहिल्यांदा माथेरान-नेरळ घाटात दरड कोसळली आहे. माथेरान घाटातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगरातील लाल माती आणि दगड हे जास्त पर्जन्य माथेरान मध्ये झाल्यास दरडी कोसळल्याच्या घटना घडत असतात.

माथेरानच्या पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात आणि त्यावेळी घाटरस्ता दरडी कोसळून बंद झाल्यास त्याचा पर्यटनावर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन आम्ही जेसीबी मशीन घाटात उभी करून ठेवत असतो. त्याचा फायदा घाट रस्ता तात्काळ मोकळा करण्यात आला.
अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

Exit mobile version