आम आदमी पक्षाची प्रशासनाकडे मागणी; तहसीलदारांना दिले निवेदन
| उरण | वार्ताहर |
ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या द्रोणागिरी पर्वताचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु असून, यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. शिवाय, माती ने-आण करणार्या डंपरमुळे उरणमधील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे या दृष्टीकोनातून आम आदमी पक्षाच्या वतीने सदर सुरु असलेले मातीचे उत्खनन बंद करावे, अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे आम आदमी पार्टीने प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, वाहतूक विभाग आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून मातीचे उत्खनन बंद करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती संतोष भगत यांनी दिली.
द्रोणागिरी किल्ल्याच्या डोंगर पायथ्याशी व डोंगर परिसरातील गावानजीक मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु आहे. त्यामुळे या किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आल्याने विविध सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी तसेच ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. हे उत्खनन थांबावे यासाठी गेली अनेक वर्षे राज्य शासनाच्या विविध विभागात विविध सामाजिक संस्था, संघटनांनी पाठपुरावा, पत्रव्यवहार केला आहे. मात्र या गोष्टीकडे प्रशासनाने नेहमी दुर्लक्ष केल्याने उरण तालुक्यातील द्रोणागिरी डोंगर व आजू बाजूच्या परिसराचे पर्यावरणाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.
निसर्ग वाचावा, डोंगर वाचावे, द्रोणागिरी किल्ल्याचे अस्तित्व वाचावे यासाठी आम आदमी पक्ष उरण तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे मातीचे उत्खनन बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे उरण विधानसभा संघाचे अध्यक्ष संतोष भगत, उरण महिला तालुका उपाध्यक्ष स्नेहश्री मोहसीन मेनन, सुनिल सूर्यवंशी, मनोज घुमरे, सुधीर पाटील, भाटकर यांच्यासह अनेक आम आदमी पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.