टीम इंडियाचे अति लाड थांबवा

पराभवावरुन ज्येष्ठ क्रिकेटर्स नाराज

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

टीम इंडियाला टी-20 विश्‍वचषक-2022 जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर संघाला बाहेर पडावे लागले. यावरुन आता क्रिकेटप्रेमींबरोबरच ज्येष्ठ क्रिकेटर्स देखील कमालीचे नाराज झाल्याचे दिसत आहे. सुनील गावसकर यांनी खेळाडूंचे अति लाड थांबवा असा परखड सल्ला बीसीसीआयला दिला आहे. तर विश्‍वविजेता कर्णधार कपिल देव यांनी विजयाने हुलकावणी दिली असे सांगत टीम इंडियाला चोकर्स असे संबोधले आहे.

विजयाने हुलकावणी दिली
भारताला पहिला विश्‍वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी आता टीम इंडियाला चोकर्स म्हटले आहे. गेल्या सहा विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरीत पराभूत होऊन पाचव्यांदा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कपिल यांनी सांगितले की, मी फार कडक शब्दात टीका करणार नाही कारण हे तेच खेळाडू आहेत. ज्यांनी आम्हाला भूतकाळात सेलिब्रेट करण्याची संधी दिली आहे. पण होय, आम्ही त्यांना चोकर म्हणू शकतो. एवढ्या जवळ आल्यानंतर पुन्हा पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागत आहे, हे नाकारून चालणार नाही.

Exit mobile version