शिवसेनेचा (उबाठा) उपोषणाचा इशारा
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये शासनाच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम नियमानुसार करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपोषणाचा इशारा देण्यात आला. पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे शहर प्रमुख कुलदीप जाधव यांनी पत्र दिले आहे.
माथेरान शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने जवळपास 47 कोटींचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केला आहे. पण, या प्रकल्पाचे काम घाईगडबडीत आणि नियोजनशून्यतेने चालू आहे, असा आरोप शिवसेनेकउून करण्यात आला आहे. सांडपाणी प्रकल्पाचे काम ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या आणि विद्युत केबल अगोदरच जमिनीखालून गेल्या आहेत, अगदी त्याच बाजूने व लगतच टाकल्या गेल्या आहेत. दर 10 फूट अंतरावर सर्व वाहिन्या एकत्रित असलेले चेम्बर्स भररस्त्यातच बांधण्यात आले आहेत. आगामी काळात येथील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असून, जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार तात्काळ थांबवायला हवा. माथेरानमध्ये खोदकाम करायला परवानगी नसताना, तीन वर्षांपूर्वी तयार केलेले पेव्हर ब्लॉकचे रस्तेसुद्धा खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे जागोजागी खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे आणि मातीमुळे स्थानिक व पर्यटक हैराण झाले आहेत. तेव्हा यापुढे पेव्हर ब्लॉकचे रस्ते खोदण्याचे तात्काळ थांबविण्यात यावेत आणि खोदलेले पेव्हर ब्लॉकचे रस्ते तात्काळ पेव्हर ब्लॉक लावून पूर्ववत करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
माथेरानकरांच्या आरोग्याशी खेळ करणारा, माथेरान हे पर्यटनस्थळ खिळखिळे करणारा येथील सांडपाणी प्रकल्प बांधण्याचे चुकीचे काम तातडीने थांबवण्यात यावे, अन्यथा येथील राजकीय पक्ष, जनता, रहिवासी व ज्येष्ठ नागरिकसुद्धा नाईलाजाने आगामी काळात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. यावेळी शहर प्रमुख कुलदीप जाधव यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते रत्नदीप प्रधान, शहर उपप्रमुख सागर पाटील आदी उपस्थित होते.