विहूरचे अनधिकृत बांधकाम तातडीने थांबवा – आ.जयंत पाटील

। नागपूर । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील विहूर येथील गट नंबर 111 जमिनीवर सीआरझेड आणि एनडीझेड कायद्याचे सर्रास उल्लंघन करुन करण्यात येत असलेले अनधिकृत बांधकाम तातडीने थांबवून संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कडक कारवाई करावी,अशी जोरदार मागणी आ.जयंत पाटील यांनी शुक्रवारी (दि.3) विधानपरिषदेत केली.

जंजिर्‍याच्या नवाबाने सरकारला गट नंबर 11 मधील जमीन ही सरकारला देऊन टाकली होती. नंतर त्या जागेवर गुरचरण झाले. कबरीस्तानही झाले; मात्र ती 40 कोटीची जमीन आता अवघ्या 7 कोटीला एका खासगी विकसकाला विकण्यात आली आहे. त्या जागेवर आता संबंधित विकसकाने सीआरझेड, एनडीझेड कायद्याचे उल्लंघन करून बेकायदा काम सुरु केले आहे. ते बांधकाम त्वरित थांबवावे, अशी मागणी पाटील यांनी सभागृहात केली.

ते पुढे म्हणाले की, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीचा चेहरा आणि व्यक्ती बघून कारवाई केली जाते. हे अत्यंत गंभीर आहे. विहूर येथील गट नं. 111 या जागा जमिनीतील जागा समुद्रकिनारी लगत आहे. त्या जागेत तैजून निसार हन्सोजी ही व्यक्ती हस्ते व परहस्ते अनधिकृत व बेकायदेशीरपणे आरसीसी सिमेंट कॉलम, ब्लॉकचे व वॉल कंपाऊंड व मातीचे ढिग, खोदकाम व इतर व्यावसायिक प्रकारचे बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे.

हे बांधकाम सीआरझेड, एनडीझेड कायदा झुगारून खुलेआम व राजरोसपणे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सदर जमिनीचा बहुतांश भाग हा सीआरझेड व एनडीझेड कायद्याखाली येत असल्यामुळे या जागेत कोणतेही व्यावसायिक बांधकाम करणे हे पूर्णपणे निषिद्ध आहे, असेही त्यांनी सुचित केले.

Exit mobile version