| श्रीवर्धन | वार्ताहर |
कोरोना महामारीच्या काळापासून श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीच्या भागात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. सीआरझेड कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. येथील धनदांडग्यांचे महसूल विभागाशी साटेलोटे असल्याने बांधकामांचा सपाटा सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील समुद्रकिनारी सीआरझेेड कायद्याचे उल्लंघन करीत अनधिकृत बांधकाम अनेक धनदांडग्यांकडून सुरू आहे. गुरचरण जागा ग्रामपंचायती अखत्यारीत असते. परंतु, त्या ठिकाणच्या स्थानिक सदस्यांना किंवा नेत्यांना हाताशी धरून काही मोठ्या शहरातील धनदांडग्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे समुद्रकिनाऱ्यावरील गुरचरण जागेमध्ये बांधकाम केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी आरसीसी प्रकारचे पक्के बांधकाम करत असल्याचे दिसत आहे. याबाबत बांधकाम करणाऱ्यांना महसूल विभागाची कोणतीही भीती राहिलेली नाही. कारण, त्या त्या ठिकाणचे स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आपल्या फायद्यासाठी या बांधकामांना अभय दिल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे, आदगाव, भरडखोल, शेखाडी, कोंडविल, वाळवटी, रानवली, गालसुरे, काळींजे, हरिहरेश्वर, बागमांडला या ठिकाणी सीआरझेड कायदा धाब्यावरती बसून अनेक अनधिकृत बांधकामे या अगोदरदेखील तयार झाली आहेत. तर, अनेक बांधकामे आता सुरू असल्याची चर्चा आहे.
सदरची अनधिकृत बांधकामे करताना धनदांडगे त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना, गावातील खाबू लोकांना तसेच महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरत असल्याचे येथील नागरिकांच म्हणणे आहे. या बांधकामामुळे निसर्गरम्य असलेला असा श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारा बकाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी, याप्रकरणी रायगडचे जिल्हाधिकारी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करतील का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीच्या भागांमध्ये विशेषतः सीआरझेड झोनमध्ये येणाऱ्या विभागात जी अनधिकृतपणे बांधकामे सुरू होती, त्या बांधकाम करणाऱ्यांना महसूल विभागातर्फे नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. स्वतःतून त्यांनी बांधकाम दूर न केल्यास महसूल विभागाकडून सदरचे बांधकाम पाडण्यात येईल.
अमित शेडगे, उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन