स्वार्थासाठी मराठ्यांचा वापर करणे आता थांबवा- मनोज जरांगे

| खोपोली | वार्ताहर |

आरक्षणासाठी आतापर्यंत सुमारे 50 बांधवांनी बलिदान दिले आहे. आता स्वार्थासाठी मराठ्यांचा वापर करणे थांबवा, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आरक्षणाच्या न्यायासाठी अखंड मराठा समाज 43 वर्षे झुंज देत आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असेही जरांगे यांनी ठणकावले.
रायगड जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने खोपोली येथील डीपी मैदानावर सोमवारी जरांगेची सभा आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.

आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या नोंदी समाज शोधण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता. मात्र मराठा समाजाला जाणीवपूर्वक कागदपत्रे मिळवून दिली जात नव्हती. मोठ्या नेत्यांच्या दबावामुळे ते आजपर्यंत दिले गेले नाहीत. मात्र आता सरकारवर दबाव वाढवला आहे. त्यामुळेच गेल्या 70 वर्षे न सापडलेल्या नोंदी आता सापडत आहेत, असे जरांगे म्हणाले.
माझे शरीर साथ देत नाही. पण माझा जीव गेला, तरी चालेल पण 24 तास समाजासाठी काम करत राहणार आहे. तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणारच, असे सांगून आता प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू झाले पाहिजे, असे आवाहन जरांगेनी केले.

मराठा समाज लढून थकलेला आहे, परंतु दमलेला नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे, असे ते म्हणाले. आरक्षणामुळे लायकी नसलेला नोकरीच्या ठिकाणी जावून बसायला लागला. मात्र 500 गुण मिळविणाऱ्या मराठ्यांच्या पोरांना घरी बसावे लागले आहे. पालकाला काय करावे हे कळत नव्हते. मराठ्यांना आरक्षण दिले असते, तर आमची मुलं देखील प्रशासकीय सेवेत अधिकारीपदावर बसली असती. आरक्षण नसल्याने टक्केवारी मिळून देखील त्यांचा घात होत आहे, असेही जरांगेंनी स्पष्ट केले.

राज्यात मराठ्यांना सर्वांनी घेरले आहे. त्यामुळे तुम्ही रस्त्यावर उभे राहून तंबाखू खाऊ नका आणि आपल्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर मैदानाच्या बाहेर उभे असलेले हजारो कार्यकर्ते मैदानात येवून दाटीवाटी करून उभे राहिल्याचे चित्र दिसून आले.
75 वर्षात राज्यामध्ये जे-जे नेते झाले. त्या नेत्यांना मोठे करण्याचे काम आमच्या मराठा समाजाने जात पात न मानता केले आहे. पण पूर्वी 75 वर्षे मदत करणारा मराठा समाज आता आपल्या विरुद्ध उभा ठाकला आहे, असा इशारा त्यांनी दिला. मराठा आणि आरक्षण मिळविणारा मराठा या दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे. जात संपली नाही पाहिजे यासाठी वेळीच सावध व्हा, असे आवाहन देखील जरांगेंनी केले.
दरम्यान, म्हाताऱ्या माणसाची आम्ही कदर करतो. वय झाले की, असे होते. मी झोपत नाही, तोपर्यंत त्यांना झोप येत नाही. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललात, तर त्याला हाणलाच म्हणून समजा, अशी टीका त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता केली.

Exit mobile version