पूरग्रस्त भागात राजकीय नेत्यांनी दौरे थांबवा

शरद पवारांची सर्व नेतेमंडळींना सूचना
मुंबई | प्रतिनिधी |
पूरग्रस्त भागात मदत पुरविण्याची जबाबदारी ही सरकारची आहे.त्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रत्यक्ष पाहणी करुन नुकसानीचा आढावा घेत आहेत. अशावेळी अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दौरे टाळून सरकारला सहकार्य करावे,असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवार यांची मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद झाली. पूरग्रस्त भागात नेत्यांचे दौरे सुरू असून, त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले, पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौर्‍यावर आमची हरकत नाही. पण, मला असं वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिलं पाहिजे, असं पवार म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौर्‍याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं, असं पवार यांनी सांगितलं.लातूर भूकंपाच्यावेळीही तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनाही येऊ नका,असे आवाहन केले होते.याचे स्मरणही पवारांनी करुन दिले.

पवारांचे म्हणणे योग्यच पण…
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी जे काही आवाहन केलं आहे त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की, दौरे करताना दौरे करणार्‍यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौर्‍याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे. पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते.

Exit mobile version