| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात सध्या पश्चिमी वादळाची स्थिती असून बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि गारपीटीची नोंद होत आहे. तर राज्यातील काही भागात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती आहे यामुळे कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदली जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविली असून या भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यात सध्या काही भागात पाऊस तर काही भागात तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसात राज्यातील काही भागात पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा उष्मा वाढला तर सध्या राज्यात पुन्हा पश्चिमी विक्षोभाची स्थिती निर्माण झाली 25 एप्रिल पर्यंत राज्यातील मुख्यतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तर कोकण पट्ट्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर या दरम्यान काही जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरण राहील, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात 25 एप्रिलनंतर पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, देशात सध्या अस्थिर हवामान असून काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, देशातील उत्तरेच्या राज्यांमध्ये 25 ते 27 एप्रिल दरम्यान एका नवीन पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागात पावसाळी हवामान असताना कमाल तापमानात काही ठिकाणी घट नोंदली जात होती. मात्र, सध्या पावसाळी हवामानाचा प्रभाव असताना कमाल तापमानात फारसा बदल दिसून येत नाही. किमान तापमानातही काही भागात सरासरी तापमानाहून वाढ नोंदली जात आहे. बुधवारी दक्षिण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच उत्तर कोकणातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सातारा, सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धाराशिव, सोलापूर, लातूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली आदी भागांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात ताशी 30 ते 40 किमी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यात वर्तविण्यात आली आहे.
राज्यात पुढील तीन दिवस वादळाचा प्रभाव
