अरबी समुद्रात वादळी पावसाने मच्छिमार हवालदिल

मासेमारी ठप्प; शेकडो नौका आगरदांडा बंदरात दाखल

| मुरूड | वार्ताहर |

शुक्रवार पासून मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. खोल अरबी समुद्रात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढल्याने मच्छिमारांची दाणादाण उडाली असून मुरूड, राजपुरी, एकदरा येथील नौका धोका ओळखून तातडीने किनाऱ्यावर आल्याची माहिती एकदरा येथील नाखवा रोहन निशानदार यांनी रविवारी दिली.

मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्याचबरोबर खोल समुद्रात मासेमारीस गेलेल्या गुजरात, रत्नागिरी आणि बाहेर गावच्या 700 ते 800 नौका आगरदांडा बंदरात दाखल झाल्याची माहिती राजपुरी येथील नाखवा धनंजय गिदी आणि तांडेल संतोष खरसईकर यांनी दिली. अद्याप वादळी पावसाचा जोर कायम असून जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत.

रोहन निशानदार यांनी सांगितले की, बोंबील, कोलंबीचा सीझन नुकताच सुरू झाला होता. मोठी मासळी देखील कमी अधिक प्रमाणात मिळत होती. परंतु अरबी समुद्रात कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने प्रतिकूल आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने आम्हाला तातडीने किनारा गाठावा लागला आहे. पुढील 3 ते 4 दिवस मोठा वादळी पाऊस आणि मोठ्या लाटा उसळणार असा इशारा असल्याने कोणतीही रिस्क न घेता दुपारपासून नौका किनारा गाठत आहेत. आलेल्या मोठ्या ट्रॉलिंग नौकांनी खाड्यांतून आश्रय घेतला आहे. पावसाचा जोर अधिक असल्याचे गिदी आणि निशानदार यांनी सांगितले.

वादळी पावसामुळे किनाऱ्याकडे आलेली मासळीची पांगापांग होऊन मासळी अधिक खोल समुद्रात जाते अशी माहिती निशानदार यांनी दिली. खोल समुद्रात वादळी पावसाचा जोरअधिक वाढण्याची शक्यता अनुभवी मच्छिमारांनी रविवारी बोलताना व्यक्त केली. एकाच दिवसात रविवारी 12 तासात 100 मिमी पाऊस पडल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

संपूर्ण आगरदांडा दिघी खाडीमध्ये 4 किमी खामदे, हरवीत कुडगाव, तुरुंबाडी, दिघी जेटीपर्यंतच्या खाडीत या नौका दाटीवाटीने नांगर टाकून उभ्या असल्याची माहिती कुडगाव येथील दामोदर खरसईकर यांनी सांगितले.

Exit mobile version