साखरेची गोड कहाणी 

आपला साखर उद्योग हा नेहमीच अडचणींनी वेढलेला असतो. कधी उसाची टंचाई तर कधी अतिरिक्त ऊस आणि प्रचंड शिल्लक साखरेचा प्रश्‍न. उसाच्या शेतकर्‍यांना उचित दाम मिळण्यावरून दरवर्षी हमखास आंदोलने होत असतात. महाराष्ट्रातलं सहकारी असो की उत्तर प्रदेशातील खासगी या दोन्ही क्षेत्रातील साखर कारखान्यांवर सरकारी बंधनेही खूप आहेत. साखर ही जीवनावश्यक वस्तू मानली गेल्याने तिची विक्री किंवा उत्पादन याबाबत सरकारचा हस्तक्षेप सतत चालू असतो. यामुळे या उद्योगातून गोड बातम्या फार कमी वेळा ऐकू येतात. साखरेच्या निर्यातीमध्ये सर्व जगात भारत दुसर्‍या क्रमांकाचा देश झाला असल्याची बातमी अशापैकी एक आहे. येत्या 31 मार्चला संपणार्‍या वर्षात भारताची साखर निर्यात सुमारे पाचशे कोटी डॉलर किंवा 45 हजार कोटी रुपयांची होईल असा अंदाज आहे. तांदुळ हा आपल्या निर्यातीतला हुकुमाचा एक्का आहे. त्यातून आपण सुमारे अकराशे कोटी डॉलर कमावतो. त्याखालोखाल माशांच्या निर्यातीचा क्रमांक लागतो. त्यातून सुमारे सातशे कोटी डॉलर मिळतात. साखरेने आता तिसरा क्रमांक पटकावला आहे. पूर्वापार आपण शुभ्र साखरेची निर्यात करीत होतो. पण ती जगाला पुरेशी पांढरी आणि खाण्यायोग्य वाटत नसे. त्यामुळे आपण कच्च्या साखरेच्या निर्यातीवर भर देण्याचे ठरवले. त्यानुसार साधारण मातकट रंगाची ही कच्ची साखर आपण इंडोनेशिया व बांगलादेशातील शुद्धीकरण कारखान्यांमध्ये पाठवली जाऊ लागली. 2017-18 मध्ये देशात साखरेचे प्रचंड साठे पडून राहिल्याने केंद्र सरकारने या योजनेला गती दिली. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. आपली भौगोलिक स्थितीही आपल्याला अनुकूल ठरते आहे. ब्राझीलमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये मुख्यतः तेथील कारखाने साखर उत्पादन करतात. आपले उसाचे गाळप नेमके ऑक्टोबर ते मार्च किंवा एप्रिलपर्यंत चालते. त्यामुळे ब्राझीलची साखर उपलब्ध नसते तेव्हा आपली होऊ लागते. इतकी वर्षे थायलंड व ऑस्ट्रेलिया हे देश साखर उत्पादनात आपल्या पुढे होते. पण कच्च्या साखरेकडे मोहोरा वळवल्यानंतर स्थिती बदलली. 2021-22 मध्ये निर्यातीने उच्चांक गाठला. आपण 110 लाख टन साखर जगाच्या बाजारात नेली. यंदा मात्र देशांतील उत्पादन कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने निर्यातीवर निर्बंध घातले. त्यानुसार गेल्या वर्षीच्या निम्मीच निर्यात शक्य आहे. पण ही वाढवण्यास भरपूर वाव आहे. उसाच्या मळीपासून इथेनॉल तयार करण्यातूनही आपण उत्पन्न वाढवू शकतो. मात्र हे करताना पर्यावरणाचे भान राखणेही आवश्यक आहे. साखरेची निर्यात म्हणजेच एका अर्थी आपण उसासाठी लागणार्‍या पाण्याचीही निर्यात करीत असतो. उसाला प्रचंड पाणी लागते आणि भूगर्भातील त्याची पातळी खाली चालली आहे. एक क्रमांकाच्या निर्यातवाल्या तांदळालाही विपुल पाणी लागते. अशा स्थितीत कमी पाण्यावर अधिकाधिक ऊस आणि तांदुळ पिकवणे हे आपले पुढील उद्दिष्ट असायला हवे. तरच खर्‍या अर्थाने साखरेची कहाणी गोड होऊ शकेल.

Exit mobile version