। खोपोली। प्रतिनिधी।
मुबंई- पुणे महामार्गावर मंगळवारी (दि. 17) पहाटे एका एलपीजी गॅस टँकरने समोरील ट्रेलर आणि अज्ञात ट्रकला जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात गॅस टॅंकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुबंई- पुणे महामार्गावरून एलपीजी गॅस टँकर चालक सुनील तांबरे (50) रा. धाराशिव हा मुबंईहुन पुण्याकडे एलपीजी टँकर घेऊन जात असताना खालापूर टोल नाक्याच्या पाठीमागे आला असता, चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील साईड पट्टीवर उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. तर पुढे उभ्या असलेल्या अज्ञात ट्रकला ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.
या अपघातात गॅस टँकरची केबिन दबल्याने त्या केबिनमध्ये चालक सुनील तांबरे याचा अडकून जागीच मृत्यू झाला आहे. तर अद्यात ट्रक चालक हा पळून गेला आहे. या टँकर मध्ये एलपीजी गॅस असल्याने त्यांची माहिती तात्काळ केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांना देऊन ते घटनास्थळी आल्याने त्यांनी या टँकरची तपासणी केली असता गॅस लिकेज नसल्याचे सांगितल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलीस, बोरघाट महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, आयआरबी पेट्रोलिंग, यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत केबिन मध्ये अडककेल्या चालकला बाहेर काढून दोन्ही अपघात ग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतूकसाठी चालू करण्यात आला.







