। मुरुड । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायतीमधील गट नंबर 111 या जागेत सी.आर.झेड.व एन.डी.झेड.कायदा झुगारून खुलेआम बांधकाम होत असताना त्याविरोधात तक्रार करणार्या ग्रामस्थांनाच दमदाटी करीत अतिक्रमण करणार्यांना संरक्षण देणार्या मुरुड पोलिसांच्या व्यवहाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे करण्यामागे पोलिसांचे नक्की काय इंटरेस्ट आहे असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
मुरुड तालुक्यातील मौजे विहूर येथील गट नं. 111 या जागेत सी.आर.झेड.व एन.डी.झेड.कायदा झुगारून होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत अनेकवेळा ग्रामस्थांकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. गुरचरण व सार्वजनिक वापर असलेल्या या जागे संबंधी प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. परंतु या अधिकृत बांधकामा विरुद्ध स्थानिक प्राधिकरण म्हणून ग्रामपंचायतीने सुद्धा संबंधितांना नोटीस पाठविली आहे. याबाबत तालुका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने खरे तर ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायतीच्या बाजुने कारवाई करणे अपेक्षित होती. मात्र त्या उलट प्रशासन आणि पोलिस प्रशासन अतिक्रमण करणार्यांनाच पाठिशी घालत असल्याचे समोर दिसत आहे. या मागचे गौडबंगाल नक्की काय असा प्रश्न मुरुड तालुक्यातील जनतेला पडला आहे. एखाद्या सर्वसामान्य ग्रामस्थाने आसरा मिळण्यासाठी जर खोपटे उभारले तर त्याविरोधात कारवाईचा बडगा उगारणारे पोेलिस आणि तालुका प्रशासन आता मात्र धनदांडग्यांच्या बाजुने उभे राहत असल्याने नक्कीच यात स्पेशल इंटरेस्ट असले पाहिजे अशी चर्चा ग्रामस्थांमधून केली जात आहे.
गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे कर्तव्य असताना पोलिस आणि तालुका प्रशासनच हेतुपुरस्पर जमीन धारक व विकासक निर्माण करीत असलेल्या कायदा व सुव्यवस्थेकडे डोळेझाक करीत आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. विरोध करणार्या ग्रामस्थांच्या विरुद्ध राजकीय दबाव तंत्र वापरून पोलीस कारवाई होईल. अशी परिस्थिती निर्माण केली जाते. आतापर्यंत गट नंबर 111 मधील दैनंदिन कब्रस्तान, दर्गा अशा धार्मिक व सार्वजनिक पाण्याची विहीर वापर करत असलेल्या ग्रामस्थां विरुद्ध पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
या अन्यायाविरोधात विहूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश दिवेकर,मुसर्रत मेहबूब उलडे, सज्जाद उलडे,इकरार मोदी, माजी उपसरपंच फैसल उलडे, माजी सदस्य मुनीर पांगारकर,प्यारा किल्लेदार,बबलू पांगारकर,ताजुद्दीन उलडे,हिलाल हलडे,गजनफर पांगारकर, सुलतान उलडे, मेहबूब उलडे, एजाज पांगारकर, हिदायत उलडे, महंमद उलडे यांसह महिला व ग्रामस्थांनी आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवरकच या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.