| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-पेण मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असताना, त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. आता भरपावसात चेंढरे बायपासपासून पुढील खड्डे डांबरीकरण करून भरण्यात आले आहेत. ठेकेदाराचा अजब कारभार यातून दिसून आला आहे. खड्ड्यांवर लाखो रुपये खर्च करून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अलिबाग-पेण मार्गावरील रस्ता नक्की कोणाच्या अखत्यारित आहे? सार्वजनिक बांधकाम विभाग की राष्ट्रीय महामार्ग विभाग, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या रस्त्याची जबाबदारी घेण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग तयार नाहीत. तर, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष, अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असतो. संबंधित विभाग याबाबत जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास आहे. शहराच्या प्रवेशद्वारासमोर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपत केली. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. बांधकाम विभाग या खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीबाबत उदासीन असल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करणे गरजेचे असताना, भरपावसात ठेकेदाराने डांबरीकरण करून दुरुस्ती केली. मात्र, डांबरीकरण करून टाकण्यात आलेली खडी विखुरली. त्यामुळे काही क्षणातच दुरुस्तीचा खर्च वाया गेला. पावसाळ्यात डांबरीकरणाने खड्डे बुजविण्याच्या ठेकेदाराच्या प्रतापाबाबत अनेकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.
गाडीला दे धक्का!
चेंढरे बायपासपासून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. डांबर, खडीचा वापर करीत खड्ड्यांची दुरुस्ती ठेकेदाराच्या मार्फत करण्यात आली. मात्र, मालाची वाहतूक करणारा ट्रकच बंद पडला. त्यामुळे या ट्रकला धक्का देण्याची वेळ कामगारांवर आली.