अजब चोरट्यांचा गजब कारभार! चोरीसाठी आणले दिवाळीतील फटाक्यांचे पिस्तुल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सहाणगोठी येथून पकडण्यात आलेल्या चोरटयांच्या ताब्यातून पोलिसांना आठ मोबाईल फोन आणि एक पिस्तुल आढळून आली. सदर पिस्तुल पाहून या चौकडीचा मोठा घातपाताचा कट असल्याचा संशय आला होता. मात्र पोलिसांनी प्रत्यक्षात पिस्तुल हस्तगत केल्यानंतर सदर पिस्तुल ही दिवाळीत फटाके फोडण्याची खेळण्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या पिस्तुलाची खिल्ली उडवली जात होती.

चोरी करण्याच्या मनसुब्याने आलेल्या चार चोरटयांना येथेच्छ प्रसाद देत सहाणगोठी ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरटयांकडे 8 मोबाईल, रिक्षा तसेच हत्यार आणि दिवाळीतील पिस्तूल आढळली आहे. सकाळी दोघेजण सहाणगोठी ग्रामस्थांच्या हातात सापडल्यानंतर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. मात्र ग्रामस्थांनी जंगलभागात शोध मोहिम राबवून त्यांनाही शोधून काढत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यांची चौकशी सुरु असून अट्टल चोरेटे असणार्‍या या चौघांनी पनवेल परिसरात चांगलाच हात मारला असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

Exit mobile version