श्वानप्रेमींकडून रस्त्याच्याकडेला खाद्यपदार्थ; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र विविध भागांत पाहायला मिळत आहे. विशेषतः ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प सुरू आहेत, त्या परिसरात भटक्या श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे सकाळी फिरायला जाणारे नागरिक, शाळा-महाविद्यालयांत जाणारी मुले-मुली, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासन नेमक्या कोणत्या उपाययोजना राबवत आहे, हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि त्यांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारी ज्या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे, ती संस्था प्रत्यक्षात किती प्रभावीपणे काम करीत आहे, याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अलीकडेच बदलापूर येथे भटक्या श्वानांच्या पाठलागामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. श्वानांच्या भीतीने पळताना त्या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भटक्या श्वानांचा प्रश्न किती गंभीर होऊ शकतो, याची जाणीव पुन्हा एकदा झाली आहे. दुसरीकडे, काही श्वानप्रेमींकडून रस्त्याच्याकडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ टाकले जातात. प्राणीप्रेम ही चांगली भावना असली, तरी सार्वजनिक ठिकाणी अनियंत्रित पद्धतीने खाद्यपदार्थ टाकल्यामुळे त्या ठिकाणी श्वानांचे समूह जमा होतात. परिणामी पादचारी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांसह लागू नियमांचे पालन करून निश्चित केलेल्या खाद्यस्थळांवरच श्वानांना खाद्य देण्याबाबत पालिकेने जनजागृती करावी. नियमांचे उल्लंघन होत असल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. भटक्या श्वानांवर अमानुष कारवाई हा यावरील उपाय नाही; मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.
उपाययोजना राबविण्याची मागणी
प्राणी कल्याण आणि नागरिकांचे संरक्षण या दोन्ही बाबींचा समतोल राखत पनवेल महानगरपालिका प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
