आक्षी परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील आक्षी, नागांव परिसरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढत चालले असून लहान मुले, ग्रामस्थ आणि पर्यटक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कालच नागांवमधील चिमुकलीचा भटक्या कुत्र्याच्या हल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परिणामी, नागरिकांमध्ये परिसरात कुत्र्यांची संख्या जास्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नागांवसारखा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून आक्षी ग्रामपंचायतीने गुरुवारी (दि.25) पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती अलिबाग, गटविकास अधिकारी पंचायत समिती अलिबाग तसेच तालुका आरोग्य अधिकारी अलिबाग यांना परिसरातील मोकाट कुत्र्यांना तात्काळ पकडुन त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले आहे.



अनेक दिवसांपासून आक्षी परिसरात, समुद्रकिनारी भटके कुत्रे टोळक्याने फिरताना दिसतात. त्यामुळे नागरिकांना आणि येथे येणार्‍या पर्यटकांना भटके कुत्रे डोकेदुखी ठरत असून, याकडे सबंधित शासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिक, पर्यटक हैराण
या परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले असून परिसरात फिरणेदेखील मुश्कील झाले आहे. या भागात दररोज नागरिकांसह पर्यटकही मोठ्या संख्येने ये-जा करीत असतात. अशावेळी ही कुत्री नागरिकांच्या अंगावर धावतात. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागतो.

आक्षी पंचायत हद्दीतील साखर गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात कुत्र्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. आताच घडलेल्या नागांवमधील दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आक्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधित अधिकार्‍यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले आहे. तसेच मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तसाठी येणारा खर्च करण्यास आक्षी ग्रामपंचायत तयार आहे.

रश्मी पाटील, सरपंच, आक्षी
Exit mobile version